ऑफलाईनसोबत ऑनलाईन राखी पाठविण्याची सुविधा
बेळगाव : रक्षाबंधन अवघ्या पंधरा दिवसांवर आल्याने दूरवरच्या लाडक्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. मुख्य पोस्ट कार्यालयासह शहरातील पोस्ट कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी वाढली आहे. विशेषत: स्पीड पोस्ट व रजिस्टर पोस्ट करण्याकडे कल असल्याने पोस्ट कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रक्षाबंधनादिवशी बहीण भावाला राखी बांधते. परंतु, अनेकजण नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी असल्याने बहिणींकडून पोस्टाद्वारे राखी पाठविली जाते. रजिस्टर व स्पीड पोस्टमुळे राखी पोहोचण्याची विश्वासार्हता असल्यामुळे पोस्ट कार्यालयात महिलांची गर्दी होत आहे. सोमवारी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात गर्दी झाली होती. अलीकडे नोकरदार महिलांची संख्या वाढत असल्यामुळे अशा महिलांसाठी पोस्ट विभागाने ऑनलाईन राखी हा उपक्रम मागील काही वर्षात सुरू केला आहे. कर्नाटक पोस्ट विभागाच्या वेबसाईटवर जाऊन राखी पसंत करून त्यासोबत भावांसाठी सुंदर संदेश तसेच कव्हर दिली जाणार आहे. यासाठी 140 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 ते 14 ऑगस्टदरम्यान ही सुविधा पोस्टाद्वारे उपलब्ध करून दिली आहे.
पोस्ट विभागाकडून विशेष कव्हर
राखी दूरवर जाणार असल्याने पावसामुळे नुकसान होऊ नये, यासाठी पोस्ट विभागाने विशेष कव्हर उपलब्ध करून दिली आहे. 15 रुपये किंमत असलेली हे स्पेशल कव्हर वॉटरप्रुफ असल्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. या कव्हरवर सुंदर अशा पद्धतीने राखीचे डिझाईन केले असल्याने पोस्टमनलाही यामध्ये राखीच आहे, हे स्पष्ट कळून येते.









