पदोन्नतीसह शिक्षकांच्या पदनामात बदल करा : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : प्राथमिक स्कूल टीचर (पीएसटी) शिक्षकांना पदोन्नती व बदलीमध्ये डावलण्यात आले. याविरोधात राज्यातील पीएसटी शिक्षक आक्रमक झाले असून राज्य सरकारने शिक्षकांच्या पदनामात बदल करावा व पीएसटी शिक्षकांना पदोन्नती द्यावी या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेळगाव विभागाच्यावतीने सोमवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. 2016 पूर्वी भरती झालेल्या सर्व शिक्षकांना पीएसटी म्हणून गणना केली जाते. परंतु, त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जीपीटी (ग्रॅज्युएट प्रायमरी शिक्षक) म्हणून नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक विभागातील शिक्षकांना पदोन्नती देताना शैक्षणिक अर्हता असतानाही डावलले जात आहे. त्यामुळे पीएसटी व जीपीटी या पदनामांमध्ये बदल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेचे शहराध्यक्ष बाबू सोगलण्णावर यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर 12 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथील फ्रिडम पार्क येथेही आंदोलन केले जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने बेळगाव परिसरातील प्राथमिक शिक्षक उपस्थित राहणार आहेत.









