नोंदणी कार्यालये विभक्त केल्याने अधिक ताण : कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी
बेळगाव : उत्तर विभागाच्या नोंदणी कार्यालयामध्ये सोमवारी मोठी गर्दी झाली होती. तीन वर्षापूर्वी एका ठिकाणी असलेली नोंदणी कार्यालये विभक्त करण्यात आली. दक्षिण आणि उत्तर अशी नोंदणी कार्यालये केल्यानंतर उत्तर विभागाच्या नोंदणी कार्यालयातच अधिक गर्दी होत आहे. दक्षिण नोंदणी कार्यालय अधिक दूर असल्यामुळे समस्या निर्माण झाली असून उत्तर कार्यालयात गर्दी होताना दिसत आहे. न्यायालयाच्या जवळच तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच नोंदणी कार्यालय होते. मात्र तीन वर्षापूर्वी दक्षिण विभागासाठी स्वतंत्र कार्यालय करण्यात आले. मात्र हे कार्यालय चन्नम्मानगर येथे करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आवारापासून ते फारच दूर आहे. त्यामुळे त्याचा त्रास वकिलांना होत आहे. दोन्ही कार्यालये एकत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. तरीदेखील अजूनही चन्नम्मानगर येथे हे कार्यालय असल्याने उत्तर कार्यालयातच जास्तीत जास्त कामे करून घेण्यात येत आहेत. सोमवारी या कार्यालयात कामासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. त्यामुळे या ठिकाणी अधिक गर्दी झाली होती. येथील कर्मचाऱ्यांवरदेखील अधिक ताण पडत आहे. वरचेवर या ठिकाणी गर्दी होत आहे. तेव्हा याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.









