पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची माहिती
बेळगाव : सध्या सुरू असलेले मुडा प्रकरण कायदेशीर व राजकीयदृष्ट्या यशस्वीरीत्या हाताळण्याचा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बोलून दाखविला. बेळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी विशेष विमानाने सोमवारी बेळगावात दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. राज्यपालांनी दिलेली कारणे दाखवा नोटीस मागे घ्यावी, याबरोबरच टी. जे. अब्राहम यांनी राज्यपालांकडे केलेली तक्रार राज्यपालांनी फेटाळून लावावी, अशी मागणी केली आहे. राज्यपाल यासंबंधी कोणती भूमिका घेतात, कोणता निर्णय घेतात, हे पहावे लागणार आहे. मात्र, हे प्रकरण कायदेशीर व राजकीय दोन्ही बाजूने यशस्वीरीत्या हाताळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसामुळे पूर्णपणे घराची पडझड झाल्यास तशा घरमालकांना 1 लाख 20 हजार रु. भरपाई देण्यात येणार आहे. सातत्याने पाण्याखाली जाणाऱ्या गावांचे स्थलांतर करण्यासंबंधीही विचार सुरू आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. म्हैसूर, हासन, कोडगू जिल्ह्यामध्येही आपण भेट दिली आहे. जीवितहानी प्रकरणात कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. वीजखांब, ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्तीही हाती घेतली आहे. बेळगावात गेल्या 42 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्याची सूचना केली आहे. पुढच्या आठवड्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल, वनखाते, इंधन, पाटबंधारे व आपत्ती निवारण विभागाने खबरदारी बाळगण्याची सूचना केली आहे. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आदींसह अनेक नेते उपस्थित होते.









