वृत्तसंस्था/ कोलंबो
दुसऱ्या वनडे सामन्यात लंकेने भारतावर 32 धावांनी विजय मिळवित द्विदेशीय मालिकांवरील भारताचे 19 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले. आजवर भारताने लंकेविरुद्ध सलग 11 मालिका जिंकल्या होत्या. ही परंपरा लंकेने यावेळी खंडित केली.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना टाय झाला होता. त्यामुळे लंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने शेवटचा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत राहील. यापूर्वी डिसेंबर 1997 मध्ये भारताला लंकेविरुद्ध मालिका जिंकण्यात अपयश आले होते. त्यावेळी 1-1 अशी मालिका बरोबरीत राहिली. दोन्ही देशांत बऱ्याच वर्षांपासून चुरस पहावयास मिळत असून 2000 च्या दशकांत ही चुसर शिगेला पोहोचली होती. 2005 पासून भारताने द्विदेशीय मालिका जिंकण्यास प्रारंभ केला होता. सात सामन्यांची मालिका भारताने 6-1 अशी जिंकली होती. मागील वर्षी लंकेविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेपर्यंत ही विजयी मालिका सुरू राहिली होती. ही मालिका भारताने 3-0 अशी जिंकली होती. या कालावधीत भारताने लंकेविरुद्ध पाच अवे मालिका जिंकल्या.









