ओला दुष्काळ जाहीर करावा, शिव स्वराज्य संघटनेची मागणी : खानापूर तहसीलदारांना निवेदन
खानापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. याची योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन शिव स्वराज्य संघटनेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठांकडे निवेदन पाठवून देण्याचे आश्वासन दिले. तालुक्यात संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे या लोकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. मागील काळात 5 लाख रुपये तातडीची मदत देण्यात येत होती.
मात्र यावेळी अत्यंत कमी नुकसानभरपाई देण्यात येत असल्याने नुकसानग्रस्तांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी योग्य पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच संततधार सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यासाठी सरकारने खानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, बाळाराम शेलार, सुनिल पाटील, उदय पाटील, उदय भोसले, रणजित पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









