वृत्तसंस्था/ पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या झेंग क्विनवेनने क्रोएशियाच्या डोना व्हेकिकचा सरळ सेट्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
सहाव्या मानांकित 21 वर्षीय झेंगने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात व्हेकिकचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये टेनिस या क्रीडा प्रकारातील एकेरीत सुवर्णपदक मिळविणारी झेंग क्विनवेन ही चीनची पहिली महिला टेनिसपटू आहे. यापूर्वी म्हणजे 2004 साली अॅथेन्स झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत चीनच्या तिंग आणि तियान यांनी महिलांच्या दुहेरीतील सुवर्णपदक मिळविले होते. महिला एकेरीत पोलंडच्या स्वायटेकने स्लोव्हाकियाच्या स्किमेडलोव्हाचा 6-2, 6-1 असा पराभव करत कांस्यपदक पटकाविले. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डन आणि जॉन पियर्स या जोडीने पुरुष दुहेरीतील सुवर्णपदक पटकाविताना अमेरिकेच्या क्रेझीसेक व राजीव राम यांचा 6-7 (6-8), 7-6 (7-1), 10-8 असा पराभव केला.









