वृत्तसंस्था/ पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनच्या महिला टेनिसपटू क्रिस्टिना बुस्का आणि सारा सोरिबस टोर्मो यांनी टेनिस या क्रीडा प्रकारातील महिलांच्या दुहेरीत कांस्यपदक पटकाविले.
महिला दुहेरीच्या कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात बुस्का आणि टोर्मो यांनी झेक प्रजासत्ताकच्या मुचोव्हा आणि नोस्कोव्हा यांचा 6-2, 6-2 असा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील स्पेनचे हे पाचवे पदक आहे. बुस्का आणि टोर्मो या जोडीने यापूर्वी म्हणजे गेल्या मे महिन्यात माद्रिद येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. मात्र या दोघींनाही ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविता आलेले नाही. मुचोव्हा आणि नोस्कोव्हा या झेकच्या जोडीने पहिल्यांदाच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते. या जोडीने दुसऱ्या फेरीतील सामन्यात गॉफ आणि पेगुला यांचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला होता.









