दीपिका कुमारीच्या पराभवास भारताचे आव्हानही संपुष्टात : गोळाफेकमध्येही भारताचे पॅकअप
वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिक स्पर्धेत शनिवारी भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीच्या पराभवासह तिरंदाजीत भारताचे आव्हान देखील संपुष्टात आले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताला एकही पदक जिंकता आले नाही. चौथे ऑलिम्पिक खेळत असलेल्या दीपिकाने शेवटपर्यंत झुंज दिली पण 19 वर्षीय कोरियन खेळाडूकडून तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, युवा तिरंदाज भजन कौरचे देखील ऑलिम्पिकमधून पॅकअप झाले.
भारताच्या दीपिकाने सध्याची सुवर्णपदक विजेती सुह्यॉनविरुद्ध 4-2 अशी आघाडी घेतली होती. पण शेवटी तिचा 4-6 (28-26, 25-28, 29-28, 27-29, 27-29) असा पराभव झाला. सुह्यॉनने शेवटचे दोन सेट सलग जिंकले. कोरियन तिरंदाजानं चार वेळा 10 गुण आणि दोनदा नऊ गुण मिळवून दोन्ही सेट आणि सामना जिंकला. तत्पूर्वी, दीपिकानं जर्मनीच्या सातव्या मानांकित मिशेल क्रॉपेनचा 6-4 असा पराभव केला होता. यासह भारताची तिरंदाजीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याची प्रतिक्षाही लांबली आहे. तिरंदाजीत भारताला आतापर्यंत एकही पदक जिंकता आलेले नाही. याशिवाय, उपउपांत्यपूर्व फेरीतील लढतीत भारताच्या भजन कौरला इंडोनेशियाच्या डायनंदाने 5-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
स्कीटमध्ये महेश्वरी-रायझा स्पर्धेबाहेर
भारतीय नेमबाज महेश्वरी चौहान आणि रायझा धिल्लन या महिला स्कीट पात्रता फेरी-2 स्पर्धेनंतर टॉप-6 मधून बाहेर पडल्या आहेत. पात्रतेच्या पहिल्या दिवशी तीन फेऱ्या होतील, तर दुसऱ्या दिवशी रविवारी अंतिम दोन फेऱ्या होतील. महेश्वरी पहिल्या फेरीत 23 आणि दुसऱ्या फेरीत 24 गुणांसह एकूण 47 गुणांसह 14 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रायझाने पहिल्या फेरीत 21 आणि दुसऱ्या फेरीत 22 गुण मिळवले आणि तिने गुणसंख्या 43 वर नेली आणि तिला 27 व्या स्थानी समाधान मानावे लागले. पात्रतेतील अव्वल सहा नेमबाज उद्याच्या अंतिम फेरीत प्रवेश करतील.
गोळाफेकमध्ये तजिंदरपाल पात्रता फेरीतच पराभूत
पुरुषांच्या शॉटपुट पात्रता स्पर्धेत भारताच्या तजिंदरपाल सिंग तूरची 15 व्या स्थानावर घसरण केली, ज्यामुळे शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो बाहेर पडला. पहिल्या प्रयत्नात तजिंदरपालने 18.05 मीटर गोळा फेकला, ज्यामुळे तो पहिल्या फेरीच्या शेवटी 14 व्या स्थानावर पोहोचला. यानंतर दुसरा व तिसरा प्रयत्न फाऊल झाला. यामुळे त्याला पात्रता फेरीतच पॅकअप करावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला निराशाजनक कामगिरीसह बाहेर पडावे लागले.









