वृत्तसंस्था/ नॅनटेरे (फ्रान्स)
लिओन मर्चंडने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपली वर्चस्वपूर्ण वाटचाल पूर्ण केली असून शुक्रवारी रात्री 200 मीटर वैयक्तिक मेडलेमध्ये त्याने आपले जलतरणातील चौथे सुवर्ण जिंकले. या 22 वर्षीय फ्रेंच जलतरणपटूने आपल्या देशातल्या उन्हाळी खेळांतील सर्वात मोठा स्टार म्हणून त्याची आठवण कायम राहील याची तजवीज केलेली आहे.
लिओनने मेडलेमध्ये 1 मिनिट 54.06 सेकंदांच्या ऑलिम्पिक विक्रमाला स्पर्श केला, पण रायन लोच्टेचा 13 वर्षे टिकलेला जागतिक विक्रम मात्र त्याला किंचित फरकाने हुकला. ला डिफेन्स एरिना येथे त्याला साध्य न करता आलेली ती एकमेव गोष्ट होती. तिथे त्याने यापूर्वी 400 मीटर्स वैयक्तिक मेडले, 200 मीटर्स बटरफ्लाय आणि 200 मीटर्स बॅकस्ट्रोक या शर्यती जिंकल्या. शेवटच्या दोन शर्यतींत तर त्याने त्याच रात्री सुमारे दोन तासांच्या अंतराने जेतेपद मिळविले.
मर्चंडच्या विजयापूर्वी कॅमेरॉन मॅकेव्हॉय व कायली मॅककिऑन यांनी ऑस्ट्रेलियाला आणखी सुवर्णपदके जिंकून दिली. मॅकेव्हॉयने 50 मीटर्स फ्रीस्टाईलमध्ये प्रथम स्थान पटकावले, तर 200 मीटर्स बॅकस्ट्रोकमध्ये विजय मिळविल्यानंतर मॅककिऑन सलग दोन उन्हाळी खेळांमध्ये बॅकस्ट्रोक प्रकाराचे जेतेपद मिळविणारी पहिली महिला जलतरणपटू बनली. मॅकेव्हॉय या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला ऑस्ट्रेलियन पुऊष ठरला. त्यानंतर मॅककिऑनने पटकन भर टाकल्याने ऑस्ट्रेलियाची एकूण सुवर्णपदक संख्या 7 वर गेली.









