वृत्तसंस्था/ पॅरिस
टोकियो गेम्समधील रौप्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारत हा जोम आज रविवारी पुऊषांच्या हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा सामना करताना कायम राखण्याचा प्रयत्न करेल. भारताने आपल्या शेवटच्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाला 3-2 ने हरवून 52 वर्षांतील ऑलिम्पिकमधील त्यांच्याविरुद्धचा पहिला विजय नोंदवला.
विजयामुळे भारत गटात विद्यमान ऑलिम्पिक विजेते बेल्जियमच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला, तर ब्रिटन ‘अ’ गटात तिसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय संघाने पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियाविऊद्ध पूर्णपणे वर्चस्व गाजविले आणि आपल्या अथक आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यावर नियंत्रण ठेवले. मनप्रीत सिंग आणि उपकर्णधार हार्दिक सिंग यांच्या नेतृत्वाखालील मधली फळी आणि आघाडी फळी यांच्यातील समन्वय हे ऑस्ट्रेलियाविऊद्ध भारताच्या कामगिरीचे वैशिष्ट्या राहिले. आघाडीफळीत गुरजंत सिंग व सुखजित सिंग यांनी जोरदार चमक दाखविली.
टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेते भारतीय जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनला नमविण्याच्या दृष्टीने या दोन्ही विभागांकडून अपेक्षा ठेवून असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडीफळीत अभिषेकही फॉर्मात राहून त्याने भारताला आघाडी मिळवून देणारा उत्कृष्ट फिल्ड गोल केला, तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा चमक दाखवत दोन गोल केले. त्याशिवाय अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंगने बचावफळीत चमकदार कामगिरी केली. अनुभवी गोलरक्षक श्रीजेशने प्रतिस्पर्ध्यांचे अनेक प्रयत्न उधळून लावले आणि ब्रिटनविऊद्ध पुन्हा एकदा त्याने अभेद्य भिंतीसारखे उभे ठाकावे अशी संघाची अपेक्षा असेल. दरम्यान, अन्य उपांत्यपूर्व सामन्यांत बेल्जियमचा सामना स्पेनशी, ऑस्ट्रेलियाचा नेदरलँड्सशी आणि जर्मनीचा सामना अर्जेंटिनाशी होईल.









