आपल्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे ही सर्वांचीच इच्छा आहे. ‘जीवेत् शरद: शतम्’ ही शुभेच्छा आपल्या भारतीय संस्कृतीचा भागच आहे. तथापि, 100 वर्षांचे आरोग्यमय आयुष्य केवळ काही जणांच्याच ललाटी लिहिलेले असते. जपानमध्ये परिस्थिती पुष्कळशी वेगळी आहे. त्या देशात अनेक लोक दीर्घायुषी असतात आणि अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे आरोग्यही टिकून असते. तसेच जपानी लोकांचे तारुण्याही त्यांच्या वयाच्या सत्तरीपर्यंत किंवा त्याहीपुढे असते.
जपान्यांच्या या दीर्घायुष्याचे आणि दीर्घकालीन तारुण्याचे रहस्य कोणते, हा प्रश्न जगभरात आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या आहार संस्कृतीत दडलेले आहे. एकाच वेळी जास्त न खाता, थोडेथोडे खाणे, प्रत्येक पदार्थ नीट चावून खाणे, आपल्या आहारात ते जास्त तळलेल्या किंवा अतिशिजविलेल्या पदार्थांचा समावेश करत नाहीत. फर्मेंटेड अन्न, समुद्री भाज्या, मोसमी फळे आणि धान्य, मासे आणि नैसर्गिक स्वरुपातील अन्नाचा समावेश त्यांच्या खाण्यात सर्वाधिक प्रमाणात असतो. अधिक उष्मांकांचे पदार्थ ते टाळतात. त्याऐवजी कमी मेद असणाऱ्या पर्दांथांचे सेवन अधिक प्रमाणात करतात. त्यांच्या आहारात साखर आणि संपृक्त मेद यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. असा आहार चवीला फारसा चांगला नसतो. तथापि, प्रत्येक जपानी बालकाला बालपणापासून असेच पदार्थ खाण्याची सवय घरातूनच लावलेली असल्याने चवीपेक्षा शरिराचे पोषण हे त्यांच्या आहाराचे सूत्र असते. हे संस्कार जपानी संस्कृतीमुळे बालपणापासूनच त्यांच्यावर होतात. त्याचा लाभ त्यांना त्यांच्या उत्तरायुष्यात मोठ्या प्रमाणात होतो, असे तज्ञांचे मत आहे. याशिवाय, ते स्वयंचलित वाहने केवळ लांबच्या प्रवासासाठीच उपयोगात आणतात. 10 ते 15 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी आवर्जून सायकल चालवितात. त्यामुळे सातत्याने व्यायाम होऊन शरीर बराच काळ व्याधीमुक्त आणि वार्धक्यमुक्त राहते. या जीवनशैलीचे अनुकरण साऱ्यांनी केल्यास त्यांनाही चांगले परिणाम मिळतात, असे अनेक जपानी आणि इतर देशांतील संशोधकांनी स्पष्ट केले आहे.









