वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आता रंगात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि डेमॉक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्याशी प्रगट वादविवाद करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. 4 सप्टेंबरला आपण टीव्ही वादविवादासाठी सज्ज असू असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. प्रारंभी त्यांनी वादविवादात भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता.
ट्रंप आणि विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्यात वादविवादाची एक फेरी पार पडली आहे. मात्र, त्या फेरीत बायडेन हे निष्प्रभ ठरले. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांची लोकप्रियता वाढली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या डेमॉव्रेटिक पक्षाने बायडेन यांना उमेदवारी सोडावयास लावली. त्यानंतर विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची उमेदवार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे आपल्याला अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी आशा डेमॉव्रेटिक पक्षाला वाटत आहे. कमला हॅरिस यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच ट्रंप यांनी आपण त्यांच्याशी प्रकट वादविवाद करणार नाही अशी घोषणा केली होती. तथापि, आता ते वादासाठी सज्ज असल्याचे त्यांच्या पक्षाच्या वतीनेही स्पष्ट करण्यात आले.
पेन्सिलव्हानियात होणार वाद
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या या निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये वादविवादाची द्वितीय फेरी अमेरिकेच्या पेन्सिलव्हानिया प्रांतात होणार आहे. या वादविवादाचा नेमका दिवस अद्याप ठरलेला नाही. तथापि, 17 सप्टेंबरला हा कार्यक्रम होऊ शकतो. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार काळात अशा वादविवादाच्या किमान तीन फेऱ्या होतात. या वादविवादाला तेथे मोठे महत्व आहे.









