तामिळनाडूच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, भारतीय जनता पक्षाची सडकून टीका
वृत्तसंस्था / चेन्नई
प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही, असे वादग्रस्त व्यक्तव्य तामिळनाडूचे मंत्री एस. एस. शिवशंकर यांनी केले आहे. त्यामुळे मोठाच गदारोळ उठला असून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या विधानाचा खरपूर समाचार घेतला आहे. तामिळनाडूच्या मंत्र्याच्या या विधानामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.
शिवशंकर यांनी भगवान राम यांची तुलना चोळ साम्राज्याच्या राजांशी केली. चोळ साम्राज्य दक्षिण भारतात इसवीसनापूर्वीच्या काळात होऊन गेले आहे. मात्र, या राजघराण्याच्या राजांनी निर्माण केलेल्या वास्तू आजही पहावयास मिळतात. त्यामुळे हे राजघराणे अस्तित्वात होते याचा पुरातत्वशास्त्रीय पुरावा सापडतो. पण भगवान रामांच्या संदर्भात असे पुरावे नसल्याने त्यांचे अस्तित्व होते हे सिद्ध होत नाही, असे शिवशंकर यांचे म्हणणे आहे. ते द्रमुक या पक्षाचे नेते आहेत.
ग्रंथांवर अश्लाघ्य टीका
भगवान रामांच्या अस्तित्वावरच शंका घेऊन शिवशंकर थांबलेले नाहीत. तर त्यांनी रामायण आणि महाभारत या हिंदूंच्या प्राचीन आणि आदरणीय ग्रंथांवरही टीका केली आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये मानवी जीवनासंबंधी कोणतेही मार्गदर्शन किंवा धडे नाहीत. या उलट 2000 वर्षांपूर्वी थिरुवल्लुवर या तामिळ संताने लिहिलेल्या काव्यांमध्ये असे धडे आपल्याला सापडतात. त्यामुळे रामायण आणि महाभारत हे काल्पनिक ग्रंथ असून तो इतिहास नाही असा निष्कर्षही त्यांनी मांडला आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म 3,000 वर्षांपूर्वी झाला आणि ते देवाचे अवतार आहेत, या केवळ समजुती आहेत, असाही दावा त्यांनी केला.
अवतार आणि जन्म
भगवान रामचंद्र हे भगवंताचा अवतार असल्याचे प्रतिपादन केले जाते. तथापि, ते अवतार असतील तर त्यांचा मानव म्हणून जन्म कसा झाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते अवतार असतील तर त्यांचा मानवाप्रमाणे जन्म होणे शक्य नाही. त्यांचा मानवाप्रमाणे जन्म झाला असेल तर ते अवतार असणे शक्य नाही, असाही तथाकथित तार्किक मुद्दा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
भाजपची तीव्र प्रतिक्रिया
शिवशंकर यांचे प्रभू रामचंद्र, रामायण आणि प्राचीन भारताचा इतिहास यांच्यासंबंधीचे अज्ञान अथांग आहे. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास न करताच आणि त्यांच्यासंबंधीचे सत्य जाणून न घेताच अद्वातद्वा विधाने केली आहेत. त्यांचा हेतू समाजप्रबोधनाचा नसून केवळ हिंदू धर्माची अवमानना करणे आणि उत्तर विरुद्ध दक्षिण अशा वादाला अधिक खतपाणी घालणे हाच आहे, अशी तीव्र टीका भारतीय जनता पक्षाचे नेते अण्णामलाई यांनी केली आहे.
विधानांमधील विरोधाभास
प्रभू रामचंद्रांविषयी द्रमुक पक्षाचे नेते परस्परविरोधी विधाने करीत आहेत. केवळ एक आठवड्यापूर्वी तामिळनाडूचे कायदा मंत्री आणि द्रमुकचे नेते थिरु रघुपती यांनी भगवान रामांची स्तुती केली होती. प्रभू रामचंद्र हे सामाजिक न्यायाचे महानायक होते. त्यांनी भारतात धर्मनिरपेक्षतेचा पाया घातला. तसेच त्यांनी ‘सर्व समान’ हा मंत्र आपल्याला दिला, अशी प्रशंसा त्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर केवळ सातच दिवसांमध्ये याच पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री शिवशंकर यांनी रामाची अवमानना केली आहे. या पक्ष अशी कृती हेतुपुरस्सर करत असून समाजात गोंधळ आणि गैरसमज निर्माण व्हावेत अशी या पक्षाची योजना आहे. तामिळनाडूचे मानचिन्ह असणारा ‘सेंगोल’ संसदेत स्थापन करण्यालाही द्रमुकने याच भूमिकेतून विरोध केला आहे. या पक्षाचे नेत्यांना कधी भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आणि भारतात जन्मलेल्या युगपुरुषांच्या प्रेमाचा उमाळा येतो, तर कधी याच पक्षाचे नेते याच्या विरोधात अश्लाघ्य भाषा करतात. यावरुन हा पक्ष किती गोंधळलेला आहे, याची प्रचीती येते. मात्र अशी ही परस्परविरोधी भूमिका राजकीय स्वार्थापोटी घेतली जात आहे. समाज कोणत्याही एका निष्कर्षापर्यंत पोहचू नये, असे या पक्षाला वाटते. त्यामुळे ही लपवाछपवी केली जात आहे. तथापि, या देशातील जनता सूज्ञ असल्याने या पक्षाची डाळ शिजणार नाही. त्यांना धडा मिळेलच, असेही प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते अण्णामलाई यांनी केले.
पुन्हा वादाचा जन्म
ड काही महिन्यांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची द्रमुककडून उजळणी
ड प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व आणि कार्य यांच्यासंबंधी परस्परविरोधी भाषा
ड द्रमुकच्या एका मंत्र्याकडून रामाची स्तुती, तर दुसऱ्या मंत्र्याकडून निंदा
ड भारतीय जनता पक्षाचे नेते अण्णामलाई यांची द्रमुकवर जोरदार टीका









