इराण्णा कडाडी यांचे राज्यसभेत केंद्राला आवाहन
बेळगाव : संततधार पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या कर्नाटकातील नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने धाव घ्यावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बुधवारी राज्यसभेत केली आहे. लक्षवेधी सूचनेंतर्गत इराण्णा कडाडी यांनी केरळ व कर्नाटकात अतिवृष्टीमुळे झालेल्या जनजीवनावरील परिणामाविषयी केंद्राचे लक्ष वेधले. पश्चिम घाटातील जोरदार पावसामुळे कृष्णा, घटप्रभा नद्या धोक्याची पातळी ओलांडल्या आहेत. जिल्ह्यातील जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील कोयना व राजापूर जलाशये भरली आहेत. या जलाशयातून 3 लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीला तर 80 हजारहून अधिक क्युसेक पाणी सोडल्यामुळे घटप्रभा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. 232 गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 44 पूल पाण्याखाली गेले आहेत. 800 हून अधिक कुटुंबातील 4 हजारहून अधिक जण काळजी केंद्रात आहेत.
700 हेक्टरहून अधिक बागायत पिकांची हानी
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जनावरेही दगावली आहेत. 46 हजार 700 हेक्टरहून अधिक बागायत पिकांची हानी झाली आहे. पावसामुळे रस्ते व पुलांचेही नुकसान झाले आहे. पावसाळ्यात नदीकाठावरील गावांना दरवर्षीच त्रास भोगावा लागतो. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना न करता केवळ काळजी केंद्रे सुरू करून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे कर्नाटकातील नागरिकांच्या मदतीसाठी केंद्राने धाव घ्यावी, अशी मागणीही इराण्णा कडाडी यांनी केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नदीकाठावर आणखी समस्या
कृष्णा व घटप्रभेतून मगर, मोठे मासे, साप, खेकडे आदी जलचर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील नागरिक भयभीत झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत कलुषित झाल्यामुळे पाण्याचेही वांदे झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नदीकाठावर आणखी समस्या निर्माण होण्याचा धोका इराण्णा कडाडी यांनी राज्यसभेत बोलून दाखविला.









