वायनाड भूस्खलनासंबंधीच्या दाव्यावर काँग्रेसचा आक्षेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वायनाड भूस्खलनासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यसभेतील दाव्यांच्या विरोधात काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दिला आहे. वायनाडमधील आपत्तीपूर्वीच केरळ सरकारला सतर्क करणारे इशारे देण्यात आले होते, परंतु केरळ सरकारने या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी राज्यसभेत म्हटले होते.
काँग्रेस खासदार रमेश यांनी राज्यसभेत प्रक्रिया आणि कार्य संचालन नियमाच्या अंतर्गत शाह यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रारंभिक इशारा प्रणालींसंबंधी अनेक दावे केले आणि आपत्तीपूर्वी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अलर्टनंतरही केरळ सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत असो शाह यांनी सांगितले होते. शाह यांच्या या दाव्याची पडताळणी प्रसारमाध्यमांकडून करण्यात आली असल्याचे जयराम रमेश यांनी स्वत:च्या तक्रारीच्या पत्रात म्हटले आहे.
गृहमंत्र्यांकडून दिशाभूल : रमेश
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अलटंसंबंधी राज्यसभेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट आहे. कुठल्याही मंत्री किंवा सदस्याकडून सभागृहाची दिशाभूल करणे विशेषाधिकाराचा भंग आणि सभागृहाचा अवमान आहे. अशा स्थितीत याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कार्यवाही सुरू केली जाऊ शकते असे जयराम रमेश यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यसभेतील शाह यांचे वक्तव्य
गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांयच गोंधळादरम्यान केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनासंबंधी वक्तव्य केले होते. केंद्र सरकारकडून या आपत्तीच्या 7 दिवसांपूर्वी प्रारंभिक इशारा केरळ सरकारला देण्यात आला होता. केरळ सरकारला 23, 24, 25 जुलै रोजी अलर्ट देण्यात आला होता. तर 26 जुलै रोजीच्या अलर्टमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये 20 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे आणि यादरम्यान भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे कळविण्यात आले होते असे शाह यांनी म्हटले होते.









