वृत्तसंस्था /तेहरान
इराणचे प्रमुख राजकीय आणि धार्मिक नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलवर थेट हल्ला करण्याची धमकी दिली आहे. बुधवारी इराणची राजधानी तेहरान येथे हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या इस्रायलनेच केली असून आम्ही इस्रायलचा सूड घेण्यास सज्ज आहोत, असे खमेनी यांनी गुरुवारी घोषित केले. हानिया याची हत्या इराणच्या भूमीवर झाली असल्याने आम्हाला इस्रायलवर आक्रमण करण्याचा अधिकार आहे. आम्ही इस्रायलला संपविण्यासाठी हल्ला करु, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. इस्रायलनेही इराणचे आव्हान स्वीकारले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आमच्यावर हल्ला केल्यास उघड युद्धाला तोंड फुटणार असून अशा स्थितीत आमच्या देशाच्या आणि समाजाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. इराणने आमच्यावर हल्ला केला तर तो इराणच्या सर्वनाशाचा प्रारंभ ठरणार आहे. आम्ही इराणच्या धमक्यांना भीक घालत नाही, असे इस्रायलने ठणकावले आहे. इराणच्या धमकीमुळे मध्यपूर्वेतील आगीत तेल ओतले जाणार आहे.
तर महायुद्धाचा प्रारंभ
इराणने खरोखरच इस्रायलवर हल्ला केला तर ती महायुद्धाची सुरवात ठरु शकते, असा इशारा अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी दिला आहे. इस्रायलनजीकच्या समुद्रात अमेरिकेच्या अनेक युद्धनौका आहेत. अमेरिकेची विमानवाहू नौकाही इराणच्या आखातात आहे. या अमेरिकेच्या युद्धनौकांना इराणच्या हल्ल्यात कोणताही धोका पोहचल्यास अमेरिकेला युद्धात पडावे लागणार आहे. परिणामी रशिया आणि चीनलाही मध्यपूर्वेत हस्तक्षेप करण्यासाठी निमित्त मिळू शकते. प्रत्यक्ष युद्धात एकटा इस्रायलही इराणला भारी पडू शकतो, असाही मतप्रवाह आहे.
हिजबुल्लाही इस्रायलच्या टार्गेटवर
लेबेनॉन या इस्रायलच्या साधारणत: उत्तरेला असलेल्या देशातील हिजबुल्ला या संघटनेवरही इस्रायल हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या संघटनेचा शुक्र नामक नेता दोन दिवसांपूर्वी मारला गेला आहे. हिजबुल्लाने अद्याप यावर आक्रमक प्रतिक्रिया दिलेली नाही. या संघटनेलाही इराणकडून पैसा आणि शस्त्रे पुरविली जात आहेत. येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेकडून प्रयत्न
मध्यपूर्वेतील स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी तसे विधान केले आहे. हानिया याच्या हत्येनंतर आता इस्रायल आणि इराणमधील संघर्ष टोकाला जाणार नाही, याची दक्षता अमेरिका घेत आहे. इराण आणि इस्रायलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अमेरिकेचे अधिकारी चर्चा करत असून इराणलाही प्रकरण अधिक न वाढविण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री लवकरच या भागाचा दौरा करण्याची शक्यता आहे.









