आर्थिक वर्ष 2024-25 मधील नफा कमाईचा अहवाल : कंपनीचे समभाग चमकले
मुंबई :
अंबुजा सिमेंटने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 571 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. सदरचा नफा वार्षिक आधारावर 11.5 टक्क्यांनी कमी आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 645 कोटी रुपयांचा नफा झाला होता. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने 4,516 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. वार्षिक आधारावर यात 4.52 टक्क्यांनी घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत तो 4,730 कोटी होता.
अंबुजा सिमेंटचे समभाग वधारले
निकालानंतर, अंबुजा सिमेंटचे शेअर्स बुधवार, 31 जुलै रोजी 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 680.35 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कंपनीचा शेअर गेल्या 5 दिवसात 0.13 टक्के आणि एका महिन्यात 2.30 टक्क्यांनी घसरला आहे. तर, गेल्या 6 महिन्यात 21.20 टक्के आणि एका वर्षात 46.67 टक्क्यांनी परतावा दिला आहे. 1 जानेवारी 2024 पासून कंपनीचा हिस्सा 27.10 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 1.67 लाख कोटी रुपयावर आहे.
अदानी समुहाने जून 2022 मध्ये अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट 10.5 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले. गौतम अदानी यांच्या कुटुंबाने अलीकडेच अंबुजा सिमेंटमध्ये 8,339 कोटींची गुंतवणूक केली आणि सिमेंट निर्मितीत हिस्सा 70.3 टक्केपर्यंत वाढवला. अंबुजा सिमेंटने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.