काँग्रेस आमदार कारवाईच्या जाळ्यात
वृत्तसंस्था/ शिमला
बनावट आयुष्मान कार्ड तयार करत रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली सरकारकडून रक्कम वसूल केल्याप्रकरणी ईडी तपास करत आहे .याप्रकरणी ईडीने दिल्ली, चंदीगड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील 19 ठिकाणी छापे टाकले आहेत. पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत बनावट आयुष्मान कार्ड तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या बनावट आयुष्मान कार्डच्या आधारावर वैद्यकीय बिलेही तयार करण्यात आली, या बिलांच्या ऐवजात मोठी रक्कम सरकारकडून मिळविण्यात आली. यामुळे सरकारला मोठे नुकसान झाले आहे.
हिमाचल प्रदेशच्या कांगडा, ऊना, शिमला, मंडील आणि कुल्लूमध्ये अशाप्रकारची फसवणूक झाली असून यात अनेक मोठ्या खासगी रुग्णालयांचाही सहभाग आहे. याप्रकरणी कांगडा जिल्ह्यातील नगरोटाचे काँग्रेस आमदार आर.एस. बाली यांचेही नाव समोर आले ओ. बाली हे हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. तर कांगडा येथील श्री बालाजी हॉस्पिटलचे डॉ. राजेश शर्मा यांचाही या घोटाळ्यात समावेश असल्याचा आरोप आहे. शर्मा हे राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचे निकटवर्तीय आहेत.