शाहुपूरी पोलिसात गुन्हा दाखल; रोकड मुदाळतिट्टा येथील एका कॉन्टक्टरची
कोल्हापूर प्रतिनिधी
नागरिकांची सतत रहद्दारी असलेल्या शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक पार्किंग केलेल्या एका कॉन्ट्रक्टरच्या किंमती चार चाकी गाडीची चोरट्याने काच फोडली. गाडीमध्ये दोन सँगमधील 3 लाख 55 हजार 200 रूपयांची रोकड चोरून पोबारा केला. याबाबत शाहुपूरी पोलिसात कॉन्ट्रक्टर दत्तात्रय बाबूराव पाटील (वय 36, रा. मुदाळतिट्टा, ता. भुदरगड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कॉन्ट्रक्टर दत्तात्रय पाटील हे कामानिमित्याने चारचाकी गाडीतून शहरात आले होते. यावेळी त्यांच्या गाडीमध्ये एका बॅगमध्ये त्यांची 45 हजार रूपयांची रोकड तर दुसऱ्या बॅगमध्ये त्यांचे मित्र मंदार प्रभाकर म्हाडगुत यांच्या मालकीची 3 लाख 10 हजार रूपयांची रोकड ठेवण्यात आली होती. अशी 3 लाख 55 हजार 200 ऊपये असलेल्या दोन्ही बॅग त्यांनी चारचाकी गाडीत ठेवून, ती गाडी शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक पार्किंग करून कामानिमित्याने लगतच्या इमारतीमध्ये गेले होते. यांची संधी साधून चोरट्याने त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाज्याची काच फोडली. त्यानंतर त्यांने गाडीचा लॉक केलेला दरवाजा उघडून, गाडीमधील रोकड असलेल्या दोन्ही बॅगा चोरून घेवून पोबारा केला.
काम संपताच पाटील आपल्या गाडी जवळ आले. त्यावेळी त्यांना गाडीची डाव्या बाजूच्या दरवाज्याची काच फोडलेली दिसली. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून रोकड असलेल्या बॅगची पाहणी केली. यावेळी त्यांना रोकड असलेल्या दोन्ही बॅग गाडीत नसल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरीत शाहुपूरी पोलिसात धाव घेवून, घडल्या घटनेची माहिती दिली. त्यावरून शाहुपूरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांची सतत रहद्दारी असलेल्या परिसरातून चार चाकी गाडीची काच फोडून, त्यामधील बॅगेमध्ये असलेली लाखो रूपयांची रोकड चोरून नेल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू करून, रोकड चोरून नेणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे फुटेज मिळते का, यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज लागले नव्हते.