राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे प्रतिपादन : आरपीडी-जीएसएस ऑटोनॉमस कॉलेजचा उद्घाटन सोहळा थाटात
बेळगाव : शिक्षणाने माणूस स्वकेंद्रित झाला तर ते शिक्षण निरर्थक ठरते. शिक्षणाने माणसाच्या अंगी समाजाप्रती सहसंवेदनेची, सहृदयतेची जाणीव वाढायला हवी. असे शिक्षण एसकेई संस्थेमध्ये देण्यात आल्याने आज या संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. आता ‘विकसित भारताचे स्वप्न’ साध्य करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि समाजातील प्रत्येक घटकाने राष्ट्रनिर्मितीमध्ये आपला सहभाग वाढविणे हीच राष्ट्रभक्ती ठरणार आहे, असे विचार बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केले. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचालित आरपीडी व जीएसएस कॉलेजना स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा राणी चन्नम्मा विद्यापीठाने दिला आहे. त्याचा उद्घाटन सोहळा सोमवारी आरपीडी-जीएसएसच्या के. एम. गिरी सभागृहात शानदारपणे पार पडला. त्यावेळी प्रमुख निमंत्रित या नात्याने राजेंद्र आर्लेकर बोलत होते. व्यासपीठावर आरसीयूचे कुलगुरु डॉ. सी. एन. त्यागराज, कुलसचिव राजश्री जैनापुरे, एसकेईचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर व सचिव अॅड. राज देशपांडे उपस्थित होते.
राज्यपाल आर्लेकर म्हणाले, मी विद्यार्थीदशेत असताना माझ्या बरोबरीचे अनेक मित्र गुणवत्ता श्रेणी पटकावत. मी तेवढा हुशार नव्हतो. परंतु, साधारण दहा वर्षांनंतर हे माझे वर्गमित्र कुठे आहेत, काय करत आहेत? याचे उत्तर निराशाजनक होते. कारण ते स्वत:च्या विश्वात गर्क होते. त्यामुळे शिक्षणाने माणूस स्वकेंद्रित होतो का? याचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि आपल्या पुढील पिढ्यांना आपण त्याचे उत्तर देण्यास बांधिलही आहोत. शिक्षण आणि परीक्षा ही केवळ एक चाचणी आहे. स्वातंत्र्यानंतर भारत जगाला मार्गदर्शन करेल, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही, हे वास्तव आहे. शिक्षणाने माणसामध्ये समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती वाढायला हवी. या संस्थेने खूप काही दिले आहे. दुसऱ्यासाठी जगण्याची पराकाष्ठा आपण करू, तेव्हा त्या व्यक्तीचे वेगळेपण आपल्याला जाणवते. हे वेगळेपण वाढविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न समोर ठेवले आहे. अशा वेळी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि नागरिक या सर्वांनी आपले उद्दिष्ट स्पष्ट करून ते गाठण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. माझ्या देशाच्या बांधणीमध्ये माझे योगदान असायलाच हवे, या भावनेने आपण जेव्हा कार्य करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘विकसित भारताचे स्वप्न’ साकार होईल, असे सांगून त्यांनी समारोप केला. यावेळी आरसीयूचे कुलगुरु सी. एन. त्यागराज म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर त्या संस्थेने स्वयंपूर्ण होणे अपेक्षित असते. त्यामुळे आता प्राध्यापकांनी केवळ ‘पीपीटी टीचर्स’ न होता शिक्षणामध्येसुद्धा आणि अध्यापनामध्येसुद्धा स्वायत्तता आणायला हवी. अन्यथा विद्यार्थ्यांचा विकास आणि जाणीवा खुरटण्याचे पाप आपल्या हातून घडेल, याकडे सी. एन. त्यागराज यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले, एक काळ होता जेव्हा शिक्षण नसताना मनुष्य स्वत:च आपल्या कुवतीनुसार शोध लावून जगत होता. शिक्षणपद्धती अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाले. त्यानंतर मुद्रण कला अस्तित्वात आली. त्यानंतर शिक्षणाचाही झपाट्याने विकास झाला. आजच्या शिक्षणपद्धतीसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान आहे. अशा वेळी शैक्षणिक संस्थांनी दर्जा जोपासने आवश्यक आहे. प्रेम, ज्ञान आणि मी आहे ना हा विश्वास माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. परंतु, क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीने प्रेम या शब्दाचे मार्केटिंग केले. परंतु, प्रेम म्हणजे शिक्षण, मातृभूमी, कर्तव्य याप्रतीचे प्रेम अभिप्रेत आहे. अज्ञान दूर होईल, असे ज्ञान देण्याची गरज आहे आणि आम्ही आहोत, हा विश्वास विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापकांकडून मिळणे महत्त्वाचे आहे. म्हणून प्राध्यापकांनी स्वत:ला अपडेट करावे व पीपीटी टीचर्स हा शिक्का लावून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
राजश्री जैनापुरे यांनी निवडणुकीदरम्यान आपण सातत्याने या संस्थेत आलो आहोत. या संस्थेने आपली मुळे आणि मूल्ये यांचा विसर पडू दिला नाही. मात्र, आज विद्यार्थी कठोर परिश्रम घेण्यास कमी पडत आहेत. त्यावर प्राध्यापकांनी लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.किरण ठाकुर म्हणाले, आज एसकेईला स्वायत्त हा दर्जा मिळाल्याने दर्जेदार शिक्षण म्हणजे काय? हे आम्ही सिद्ध केले आहे. बाबुराव ठाकुर, गंगाधरराव देशपांडे यांच्यासह अनेक धुरिणांनी या संस्थेसाठी आपले योगदान दिले आहे. त्या काळी डॉ. गोविंद हेरेकर यांनी 50 हजार रुपयांची देणगी दिली. पु. ल. देशपांडे, विं. दा. करंदीकर यांनी या संस्थेत शिक्षण घेतले. स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी लोकांनी ही संस्था सुरू केली. प्राथमिक शिक्षण मजबूत होण्याची गरज आहे. ते मजबूत झाल्यास समाजही सुसंस्कृत होईल, त्यामुळे शिक्षण ही चळवळ व्हायला हवी. या संस्थेने अनेक उत्तमोत्तम माणसे घडविली आहेत. तोच वारसा आम्ही पुढे चालवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. किरण ठाकुर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, कृष्णा मेणसे, परशुराम नंदिहळ्ळी यांचा आणि राजेंद्र आर्लेकर यांचे शिक्षक कृष्णा कदम, आर. डी. शानभाग, व्ही. एस. कलघटगी, जीएसएसचे प्राचार्य बी. एल. मजुकर, आरपीडीचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांचाही राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापैकी याळगी, मेणसे, शानभाग यांचा सत्कार त्यांच्या निकटवर्तीयांनी स्वीकारला. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रसन्न जोशी यांनी करून दिला. प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन चारुशिला बाळेकाई व अनुपमा होसूर यांनी केले. डॉ. अभय पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी राज्यपालांसमवेत एडीसी किरणकुमार, स्पेशल ऑफिसर प्रितेश देसाई उपस्थित होते. तसेच आरसीयूचे कुलसचिव रवींद्र कदम, तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर उपस्थित होते.
क्षणचित्रे
- राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे आगमन झाल्यानंतर एनसीसीच्या छात्रांनी त्यांना मानवंदना दिली.
- संस्थेच्या प्रवेशद्वारानजीक उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसमोर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, अनघा आर्लेकर, किरण ठाकुर यांच्यासह अन्य मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.
- मुख्य कार्यक्रमात मान्यवर आणि सत्कारमूर्तींना शाल अर्पण करून लामण दिवा देण्यात आला.
- स्वायत्त दर्जा मिळाला आहे, आता विद्यापीठासाठी प्रयत्न करा, असे कुलगुरु सी. एन. त्यागराज यांनी सांगितले.









