अतिवृष्टीमुळे अनेक घरांना तडे : अनेक वर्षांपासून समस्या असूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
वार्ताहर/येळ्ळूर
अतिवृष्टीमुळे येळ्ळूर येथील कुजका तलाव तुडुंब भरुन पाणी घराघरातून शिरल्याने एक घर कोसळले तर अनेक घरांना तडे गेले आहेत. काही घरांच्या परसदारातून आत आलेले पाणी समोरील दारातून बाहेर पडले आहे. ही समस्या अनेक वर्षांची असून याकडे कोणीच गांभीर्याने पाहिले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येळ्ळूर येथील लक्ष्मी गल्ली, सांबरेकर गल्ली, प्रताप गल्ली व पाटील गल्ली यांच्यामध्ये हा तलाव असून दरवर्षी पावसाळा सुरू झाला की येथे राहणाऱ्यांची धाकधुक सुरू होते. पूर्वी या तलावातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक वाटा होत्या. पण कालांतराने त्या वाटा बंद केल्या गेल्या. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे तलाव तुडुंब भरला की, अतिरिक्त पाण्याला वाट न मिळाल्यामुळे पाणी घराघरात शिरते. बरीच वर्षे ही समस्या सुरू असल्याने पाणी शिरुन ओलीमुळे घरांच्या भिंती ठिसूळ झाल्या आहेत. आता त्या हळूहळू कोसळण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मनोहर नारायण सांबरेकर यांचे घर कोसळले तर पिराजी सांबरेकर, संभाजी सांबरेकर, आप्पाजी बाचोळकर यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. महादेव सांबरेकर यांचे घर कोसळण्याच्या स्थितीत असल्याने त्यांनी घर सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे. तर काहीनी याआधीच दुसरीकडे स्थलांतर केले आहे.
पाण्याचा निचरा होणाऱ्या वाटा बंद
गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीचे या तलावाकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे तलावात रानगवत व झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. सभोवती तलावावर थोड्याफार प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे व बांधकामामुळे तलाव बंदिस्त होवून पाणी जाण्यासाठी पूर्वापार सोडलेल्या वाटा बंद झाल्या आहेत. असणाऱ्या मोकळ्या जागेवर नवीन बांधकाम आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या बंद वाटा यामुळे जुन्या घरातील नागरिक मात्र पावसाळा आला की, भिंतीच्या छायेत गारठून जात आहेत. शिवाय दलदल आणि झाडाझुडुपांमुळे विषारी प्राण्यांची भीतीही नेहमीच भेडसावत असते. याबाबत नागरिकांना विचारले असता या समस्येवर मार्ग काढण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही कोणताच मार्ग नघत नाही. फक्त आश्वासन आणि सारवासारव या पलिकडे काहीच घडले नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी मांडली.









