पुरामुळे बरीच शेती पाण्याखाली, काकती-होनगा परिसरात भात रोपलागवडीला वेग
वार्ताहर /काकती
काकती, होनगा परिसरात भात रोपलागवडीच्या कामांना वेग आला आहे. मार्कंडेय नदीला अद्यापही पूर असल्याने मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी नदीकाठची रोपलागवड ठप्प झाली आहे. येत्या 8-10 दिवसात रोप लागवड पूर्ण होणार आहे. गेल्या 10 दिवसांपासून रोप लागवडीच्या कामांना सुरुवात झाली असून काकतीत 50 टक्के भात पेरणी झाली आहे. सततच्या पावसाच्या सरींमुळे उघडीप मिळाली नसल्याने कोळपणीची कामे होऊ शकली नाहीत. काही भात पेरणीनंतर दडपणीची कामे होऊ न शकल्याने भाताचे पीक विरळ झाले आहे. त्या ठिकाणी भात पिकात रोपलागवड करण्यात येत आहे. काकती, मासेनट्टी, गगेंनाळ मिळून 1300 एकरात भात पिकाचे उद्दिष्ट यंदा साध्य होणार आहे.
होनगा परिसरातील भात रोप लागवडीला वेग आला असून 99 टक्के भात रोपलागवड होणार आहे. मडीहोळ, हेग्गेरी भागात काही ठिकाणी पेरणी झाली आहे. उर्वरित 60 टक्के रोपलागवड झाली आहे. 900 एकरात भात पिकांचे उद्दिष्ट पूर्ण होणार असून नदीच्या पुराचे पाणी ओसरताच नदीकाठची रोपलागवड होणार आहे. तर बेन्नाळीत 100 टक्के रोपलागवड पूर्ण होणार असून 99 टक्के रोपलागवड झाली आहे. गौरी नाल्याचे पाणी ओसरताच रोपलागवड पूर्ण होणार आहे. यंदा काकती, होनगा परिसरात प्रामुख्याने इंद्रायणी भात पिकाची शेतकऱ्यांनी निवड केली आहे. चिखलणीची कामे ट्रिल्लरने करण्यात येत असून माळरानावर बैलजोडीने चिखलणीची कामे केली जात आहेत.









