मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून खानापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी
खानापूर : सरकार पूरग्रस्त, तसेच पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या पाठीशी आहे. नुकसानग्रस्तांना योग्य ती नुकसानभरपाई देण्यास सरकार कटिबद्ध आहे. सरकारच्या नियोजनानुसार नुकसानभरपाई देण्यात येत आहे, असे वक्तव्य महिला व बाल कल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी खानापूर तालुक्याचा पूरग्रस्त आणि नुकसान झालेल्या भागाच्या पाहणी दौऱ्यावेळी खानापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार विठ्ठल हलगेकर आणि तालुकास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते. खानापूर-हल्याळ रस्त्यावरील मलप्रभा नदीवरील दुरवस्था झालेल्या पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या पुलाबद्दल तातडीने नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देऊन पुलाच्या बांधकामाबाबत माहिती घेतली. तसेच पाच वर्षापूर्वी बांधलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी आमदार हलगेकर यांनी अर्धवट बांधकामाबाबत हेब्बाळकरांना सविस्तर माहिती दिली. हेब्बाळकरांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत आराखडा तयार करून आजी, माजी आमदारांचे पत्र जोडून कार्यालयात द्यावे, आपण बेंगळूर येथे कॅबिनेट बैठकीत हा विषय घेऊन तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न केले जातील. ज्यांना स्थलांतर व्हायचे आहे. त्यांच्यासाठी ही योजना तयार आहे. जर दुर्गम भागातील ग्रामस्थांनी स्थलांतरासाठी संमती दिल्यास निश्चित तातडीने पावले उचलली जातील. खानापूर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या, जर आवश्यकता भासल्यास निश्चित दुष्काळ जाहीर केला जाईल, नुकताच मागीलवर्षी पाऊस न झाल्याने दुष्काळ जाहीर केला आहे. तरीही जर पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. यानंतर त्यांनी हिरेहट्टीहोळी, चिक्कहट्टीहोळी, पारिश्वाड, गाडीकोप गावांचा पाहणी दौरा केला. यावेळी चिक्कहट्टीहोळी आणि हिरेहट्टीहोळी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून अधिकाऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने देण्याचे आदेश दिले.
हिरेहट्टीहोळी येथील वीरभद्र देवस्थानची पाहणी केली. पुरामुळे वीरभद्र देवस्थानाचे प्रचंड नुकसान होत आहे. यासाठी संरक्षण भिंत बांधावी, पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आराखडा तयार केला असून यासाठी 106 कोटीच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत हेब्बाळकर यांनी आपण बेंगळूर येथे कॅबिनेट बैठकीत आराखड्यास मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. मंत्री हेब्बाळकर यांनी आमगाव येथील हर्षदा घाडी हिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. तसेच हिरेहट्टीहोळी आणि चिक्कमहट्टीहोळी येथील नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत केली.









