जिल्ह्यातील पावणे दोनशे आरओ प्रकल्प निकामी
बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी गावागावात शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प (आरओ प्लांट) उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक प्रकल्प निकामी झाल्याने व देखभालीअभावी कुचकामी ठरले आहेत. यामुळे शुद्ध पाणीपुरवठ्याचा उद्देश कागदावरच राहिला आहे. जिल्ह्यात 175 प्रकल्प निकामी असल्याची माहिती जिल्हा पंचायतीकडून उपलब्ध झाली आहे. जिल्हा पंचायतीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे व इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. हे प्रकल्प विविध सामाजिक संस्थांसह जिल्हा पंचायतीच्या ग्रामीण विकास निधीतून उभारण्यात आले आहेत. चिकोडी व बेळगाव अशा दोन विभागात हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांची देखभाल संबंधित विभागांकडे सोपविण्यात आली होती.
यानंतर हे प्रकल्प संबंधित ग्राम पंचायतींकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. बहुतांश ग्रा. पं. कडून या प्रकल्पाची देखभाल केली गेली नसल्याने ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही प्रकल्प ग्रा. पं. व सामाजिक संस्थांकडे असल्याने त्यांची देखभाल चांगल्या प्रकारे होत असून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. विशेष करून ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने हे प्रकल्प उभारले गेले होते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सरकारच्या उद्देशाला खीळ बसली आहे. या प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. हा निधीही वाया गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पावसामुळे वेगवेगळे साथीचे आजार फैलावत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, प्रकल्पच निकामी असल्याने नागरिकांना ग्राम पंचायतीकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. गावागावात असणारे शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









