वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिकमध्ये सोमवारी पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने आपला स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. लक्ष्यने बेल्जियमच्या ज्युलियन कारागीचा 21-19, 21-14 असा पराभव केला. 43 मिनिटे चाललेल्या या सामन्यात लक्ष्यने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. दरम्यान लक्ष्यचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. याआधी, लक्ष्यने पहिल्या सामन्यात ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनचा पराभव केला होता, मात्र कॉर्डनने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे लक्ष्यचा हा विजय ग्राह्या धरला गेला नाही. आता, स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी त्याला पुढील सामन्यात विजय मिळवावा लागले.
दुसरीकडे, तिरंदाजीच्या पुरुष सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाचा तुर्कीकडून 6-2 असा पराभव झाला. या संघात तरुणदीप राय, धीरज बोम्मदेवरा आणि प्रवीण जाधव यांचा समावेश होता. तुर्किने पहिले दोन सेट 57-53 आणि 55-52 असे जिंकले. त्यानंतर भारतीय संघाने तिसरा सेट 55-54 असा जिंकून पुनरागमन केले. त्यानंतर तुर्कीने शेवटचा सेट 58-54 असा जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.









