कुळे पोलिसांची कारवाई : रामनगर पोलिसांनी दोघांना अनमोडमध्ये केली अटक : कसून तपास सुरू
धारबांदोडा : कर्नाटक एसटी बसमधून विनापरवाना पिस्तुलास प्रवास करणाऱ्या मूळ राजस्थान येथील एका प्रवाशाला कुळे पोलिसांनी अटक केली. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुळे पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. लाडू सिंग (22) असे संशयिताचे नाव आहे. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायं. 7 वा. सुमारास रामनगर येथून येणाऱ्या बसमधील एका प्रवाशाकडे बेकायदा पिस्तुल असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुळे पोलिसांनी मोले चेक नाक्यावर बसची कसून तपासणी केली. यामध्ये लाडू सिंग (22) याच्याकडे विनापरवाना पिस्तुल सापडले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करून संशयिताला अटक केली. पुढील चौकशीसाठी संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव जल्मी यांनी पंचनामा केला.
दोघांना अनमोड येथे पकडले, तिसरा मोले येथे जेरबंद
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील दागिन्यांच्या दुकानांवर दरोडा टाकण्याचा बेत फसल्यानंतर आपला मोर्चा कर्नाटक हुबळी येथे वळविला होता. रेल्वमार्गे जाण्याचा बेत होता. मात्र तो फसल्यानंतर हुबळी बसने प्रवास करत असताना अनमोड येथे गोवर्धनसिंग राजपुरोहित व श्यामलाल नेगनाळ या दोघांना शनिवारी रामनगर पोलिसांनी अटक केली. त्यातून तिसरा संशयित लाडू सिंग गोव्यात पलायन करत असताना एसटी बसमध्ये कुळे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.दरम्यान, संशयिताकडे पिस्तुल व काडतूस सापडल्यामुळे पोलीस खाते सतर्क झाले असून सर्व पोलीस स्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी या तिघांही संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे.