कडोली येथील वाघमार खारीचा तलाव फुटून पिकांचे नुकसान : केदनूर-मण्णीकेरी गावची वाहतूक ठप्प
वार्ताहर /कडोली
कडोली येथील वाघमार खारीचा तलाव फुटून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुंजेनहट्टीनजीक रस्त्यावर पाणी येऊन केदनूर-मण्णीकेरी गावची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. शिवाय निम्मा रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आक्रोश निर्माण झाला आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून कडोली परिसरात मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना महापूर आला आहे. तर सर्व तलावही पाण्याने भरले आहेत. गुंजेनहट्टी-कडोली गावानजीक सुमारे 5 ते 10 एकर विस्तारलेला वाघमार खारीचा तलाव बुधवारी सकाळी फुटला. सदर तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झाला होता. या तलावातून पाणी जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना आखण्यात आली नाही. परिणामी तलाव पूर्ण भरल्यानंतर फुटला. पाण्याचा ओघ इतका मोठ्या प्रमाणात होता की शेतशिवारातून पाणी जाऊन शेतीचे सर्व बांध फुटून गेले आहेत. मका, लागवड केलेली भात पिके वाहून गेली आहेत. एकाही शेतजमिनीचे बांध शिल्लक राहिले नाहीत. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील शेतकरी हतबल झाला आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
अर्धा रस्ता वाहून गेला
तलाव फुटल्यानंतर गुंजेनहट्टीनजीक केदनूर-मण्णीकेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शिवाय पाण्याच्या ओघाने अर्धा रस्ताच वाहून गेला आहे. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होऊन बंदोबस्त करून कोणालाही पाण्याच्या प्रवाहात सोडले नाही. तलाव फुटल्याची बातमी मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सचिव मलगौडा पाटील यांनी तातडीने शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील व सदस्य उपस्थित होते.
ग्रा. पं. ची कार्यतत्पर सेवा
पाण्याच्या ओघात एका बाजूने रस्ता वाहून गेला होता. परिणामी चारचाकी वाहनधारकांनी अडचण होत होती. याची दक्षता घेऊन तातडीने जेसीबीच्या साहाय्याने वाहून आलेली झाडे-झुडपे, रस्त्याकडेला असलेली झाडे-झुडपे बाजूला करून एका बाजूने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
तलावासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी
गेल्या 5-6 वर्षांपूर्वी हाच तलाव फुटला होता. पण त्यावेळेस पाण्याचा साठा कमी होता. पण आता गेली चार वर्षे रोहयो योजना राबवून तलावाची पाणी क्षमता वाढविण्यात आली आहे. परंतु या तलावासाठी योग्य नियोजन केले जात नसल्याने दुसऱ्यांदा तलाव फुटण्याची वेळ आली आहे. या तलावात रोहयो योजना राबविण्याबरोबर इंजिनिअरची सोबत घेणे गरजेचे आहे. बंधाऱ्याच्या धर्तीवर तलाव बांधल्यास कडोली, देवगिरी, गुंजेनहट्टी, केदनूर, जाफरवाडी आदी गावे पाणी टंचाईमुक्त होतील. यासाठी ग्राम पंचायतीने योग्य नियोजन करून कायमस्वरुपी बंधाऱ्यासह तलावाची निर्मिती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांतून केली जात आहे.









