मंगाईदेवी यात्रा उद्यापासून : घरांच्या सजावटीसह विद्युत रोषणाई
बेळगाव : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगाईदेवीची यात्रा मंगळवार दि. 30 रोजी होत आहे. बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मंगाई यात्रेची ख्याती आहे. यात्रेनिमित्त वडगाव परिसरात लगबग सुरू झाली आहे. घरांना विद्युत रोषणाई करण्यासोबतच ठिकठिकाणी शुभेच्छा फलक झळकू लागले आहेत. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे नागरिकांनीही यात्रेची तयारी सुरू केली आहे.
दरवर्षी पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर पीक जोमात वाढू लागल्यानंतर यात्रा केली जाते. शेतकऱ्यांची देवी म्हणूनही वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव या परिसरात मंगाईदेवी ओळखली जाते. मंगाईदेवीचे मंदिर अत्यंत साधे असले तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मात्र मोठी असते. यात्रेपूर्वी महिनाभर देवीचे वार पाळले जातात. वडगाव गावच्या वेशीमध्ये हे वार काटेकोर नियमाद्वारे आजही तितक्याच श्रद्धेने पाळले जातात. प्रत्येक वारादिवशी कुमारिका गावातील प्रमुख मंदिरांमध्ये जाऊन पाणी वाहतात.
मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून त्यासाठी मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. येळ्ळूर क्रॉसपासून मुख्य रस्त्यांवर स्टॉल उभारू लागले आहेत. खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, खेळणी, ओटीचे साहित्य व फुले यांची विक्री करणारे स्टॉल ठिकठिकाणी उभे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भाविकांच्या स्वागतासाठी स्वागत कमानीही उभारण्यात आल्या आहेत. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त मानकरी चव्हाण-पाटील कुटुंबीयांकडून जय्यत तयारी केली जात आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेकडून वडगाव परिसरातील रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये माती तसेच खडी भरली जात आहे.









