पाण्याचा निचरा थांबला : महापालिकेच्या डोकेदुखीत वाढ
बेळगाव : दमदार पावसानंतर शहरातील कचऱ्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अनेक ठिकाणी गटारीतून कचरा साचून राहिल्याने पाण्याचा निचरा पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या निचऱ्याबरोबर गटारीतील कचऱ्याचा प्रश्न डोकेदुखी ठरू लागला आहे. शिवाय मनपाच्या स्वच्छतेचेही वाभाडे निघाले आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारींची स्वच्छता न केल्याने अनेकांना फटका बसला आहे. शिवाय कचऱ्यांमुळे रोगराईला आता सामोरे जावे लागणार आहे. शिवाय दुर्गंधीचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. त्यामुळे मनपाला पावसाळ्यात तरी शहाणपण येणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मागील आठ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मात्र, नाले आणि गटारींमध्ये कचरा साचून असल्याने पाण्याचा निचरा थांबत आहे.
त्यामुळे रस्त्याशेजारील व्यावसायिकांना याचा फटका बसू लागला आहे. अनेक रहिवाशांच्या घरांमध्येदेखील पाणी शिरल्याचे समोर आले आहे. झेंडा चौक येथील फोर्टरोडवर गटारीत साचलेल्या कचऱ्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी साचलेला कचरा रस्त्याशेजारीच टाकण्यात आला आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढू लागला आहे. वेळेत कचऱ्याची उचल न झाल्यास दुर्गंधी आणि रोगराईचा प्रश्नही उभा ठाकला आहे. मनपा केवळ पाणी साचलेल्या ठिकाणी मार्ग काढत आहे. मात्र, गटारीतील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. अन्यथा दरवर्षी पावसाळ्यात गटारीतील कचऱ्याचा प्रश्न कायम राहणार आहे.









