वाहतुकीत अडथळा, प्रशासन-वनखाते सुस्त
बेळगाव : संततधार पावसाने विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. या पडझड झालेल्या झाडांकडे प्रशासन आणि वनखात्याचे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनखात्याने पडझड झालेली झाडे तातडीने हटवून मार्ग मोकळे करावेत, अशी मागणी वाहन धारकांतून होत आहे. जुलै पंधरवड्यात पावसाने अपेक्षेपेक्षा दमदार हजेरी लावली आहे. विविध ठिकाणी पाणी साचून वादळी वाऱ्याने झाडे-झुडपे कोलमडली आहेत. काही रस्त्यांवर पडलेली झाडे अद्याप तशीच आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. विविध ठिकाणी आयुर्मान संपलेल्या आणि कमकुवत वृक्षांची संख्या मोठी आहे. अशी झाडे पावसाळ्यात उन्मळून कोसळली आहेत. मात्र, ही झाडे हटवण्याकडे वनखात्याचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे वाहतूक सर्वत्र पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, रस्त्यावरच कोसळलेली झाडे त्रासदायक ठरू लागली आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी अपघात घडण्याची शक्यता आहे. बेळगाव-बेळगुंदी, बेळगाव-हंदिगनूर आणि बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अनेक झाडे कोसळली आहेत. ती तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.









