भारतीय अंतराळवीर लवकरच अंतराळ स्थानकावर : इस्रोची खास योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत लवकरच आपला पहिला अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याच्या तयारीत आहे. मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत यासंबंधी खुलासा केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) एक गगनयात्री आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) भेट देणार आहे. इस्रो, नासा आणि अॅक्सिओम स्पेस ही एक खासगी कंपनी यांच्यातील हे संयुक्त अभियान असेल. या मोहिमेसाठी इस्रोने अॅक्सिओम स्पेससोबत करार केला आहे. ही मोहीम ऑगस्ट 2024 मध्ये फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केली जाऊ शकते.
इस्रो आणि अॅक्सिओम स्पेस यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात चौथ्या खासगी अंतराळवीर मोहिमेच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ही मोहीम फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून ऑगस्ट 2024 पूर्वी प्रक्षेपित होण्याची शक्मयता नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेसाठी निवडण्यात आलेली गगनयात्री ही गगनयान मोहिमेसाठी प्रशिक्षित होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांपैकी एक असेल. या मोहिमेसाठी इस्रोने चार वैमानिकांची निवड केली होती. या सर्वांनी रशियामध्ये अंतराळ प्रवासाच्या मूलभूत मॉड्यूल्सचे प्रशिक्षण घेतले आहे. सध्या ते सर्वजण गगनयान मोहिमेसाठी इस्रोच्या बेंगळूर येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.
गगनयान प्रशिक्षण कार्यक्रमाचे तीन पैकी दोन सेमिस्टर पूर्ण झाले आहेत. प्रशिक्षणासाठी आवश्यक सिम्युलेटर आणि स्टॅटिक मॉकअप देखील तयार आहेत. मानवाला अंतराळात घेऊन जाणाऱ्या रॉकेटचे काही भागही तयार आहेत, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी टीएमसी खासदार सौगता रॉय यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
गगनयान प्रकल्पापूर्वी हे विशेष मिशन
गगनयान प्रकल्प हे इस्रोचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. याअंतर्गत तीन अंतराळवीरांना तीन दिवस 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवून त्यांना सुखरूप पृथ्वीवर परत आणले जाईल. हे मिशन 2025 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ते भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. या मोहिमेमुळे भारत अंतराळात मानव पाठविण्याची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात सामील होईल. यामुळे अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचे स्थान आणखी मजबूत होईल.









