बिहार राज्यातील छापरा जिल्ह्यात अफौर नामक एक ग्राम आहे. या ग्रामाच्या अगदी जवळ एक प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ आहे. या स्थळाला ‘श्री योगीबाबा का स्थान’ म्हणून ओळखले जाते. येथे 100 वर्षांहून अधिक जुने एक वडाचे झाड आहे. या झाडाच्या मुळाशी एक शिवलिंग असून त्याची ख्याती मोठी आहे.
या शिवलिंगासंबंधी अशी एक समजूत आहे, की ज्या महिलांना अपत्ये होत नाहीत, त्यांनी या शिवलिंगाची पूजा केल्यास त्यांची अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. केवळ अपत्यप्राप्तीच नव्हे, तर कोणाचेही कोणतेही काम अडलेले असेल तर ते येथे पूजापाठ केल्याने तडीस जाते, असे मानले जाते. आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर श्रद्धाळू या झाडाला एक फडके बांधतात. तसेच शतरंज भगवानाची कथा ऐकवण्याचा कार्यक्रम करतात. दूरवरुन आलेल्या भक्तांची येथे रीघ लागलेली असते. या स्थानी विवाहही केले जातात. केवळ 251 रुपयांच्या खर्चात येथे विवाहाचा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे विवाहासाठी अधिक खर्च करण्याची क्षमता नसलेले असंख्य लोक येथे येऊन आपल्या मुलांचे किंवा मुलींचे विवाह लावतात.
या शिवलिंगाची पूजा केल्याने आणि येथे नवस बोलल्याने मनोकामना पूर्ण होतात, ही केवळ एक समजूत आहे आणि असे काही होत नसते, असे अनेकांचे म्हणणे आहे. या समजुतींना किंवा प्रथांना विज्ञानाचा कोणताही आधार नाही, असेही बुद्धीवादी लोक म्हणतात. तथापि, या चमत्काराचा अनुभव आपल्याला आला आहे, असे सांगणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत. टीका झाली तरी लोकांचा या स्थानावरचा विश्वास कमी होत नाही. येथे अत्यंत कमी खर्चात विवाह केले जातात, याचे मात्र सर्वांकडून कौतुक केले जाते. कारण त्यामुळे गोरगरीबांची मोठीच सोय होते. त्यांचा खर्च वाचतो आणि पवित्र स्थळी विवाहकार्य केल्याचे समाधानही त्यांना मिळते. चमत्कारापेक्षा हे कार्य महत्वाचे आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. एकंदरीत, या स्थानाचे महत्व बिहार आणि इतरत्र मोठे आहे.









