कसबा बीड/ वार्ताहर
संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्या जलमय झाला आहे. आज राधानगरी धरणातून स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यामुळे जिल्ह्याची पंचगंगा पाणी पातळी धोक्याच्या पातळीवरून जात आहे. कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील बालिंगा पूलावर पाणीपातळी वाढत असून या पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन आढावा घेतला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची वाहतूक आज रात्री ९ नंतर बंद करण्यात येईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्थानिकांशी संवाद साधताना या नदीवरील पाणी पातळीत राधानगरी धरणातील विसर्गामुळे अचानक वाढ झाली असल्याने धोका वाढल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अवजड वाहनासह इतर प्रकारच्या वाहतूकीला पुर्णपणे निर्बंध घातली असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी कोल्हापूर शहर तालुक्यांना जो़डणाऱ्या बालिंगा, हळदी, कसबा बीड या चार मार्गावरील मुख्य वाहतूक असणाऱ्या पूलांवर बोटीची व्यवस्था करावी अशी मागणी केली. तसेच बालिंगा पुलाला पर्यायी नविन पुलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा अशीही विनंती केली.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बालिंगा पुलावरून कोणीही वाहतूक करू नये, तसेच ज्या ज्या पुलावर पाणी आले आहे त्या ठिकाणी पाण्यातून प्रवास करू नये, तीन दिवस ऑरेंज अलर्ट असल्यामुळे २६ आणि २७ तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच पावसाचे प्रमाण जास्त आहे तेव्हा नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. आवश्यकता काम असेल तरच घराबाहेर पडावे, ज्यांना पुराचा फटका बसतो त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना केले.