वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय दिग्दर्शक शेखर कपूर यांची गोवा येथे आयोजित होणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल(इफ्फी)साठी महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधी माहिती-प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. शेखर कपूर यांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 55 व्या आणि 56 व्या आयोजनासाठी महोत्सव संचालक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे अधिसूचनेत नमूद आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अधिकृत पोस्टर आणि ट्रेलर देखील ‘भारत पर्व’दरम्यान सादर करण्यात आला होता. इफ्फीचे आयोजन 20-28 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात होणार आहे.
शेखर कपूर यांना बँडिट क्वीन, ब्रिटिश बायोग्राफिकल ड्रामा एलिझाबेथ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. बाफ्टा आणि गोल्डन ग्लोबमध्ये त्यांना याकरता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नामांकनही प्राप्त झाले होते. तर एलिझाबेथ चित्रपटाचा सीक्वेल ‘एलिझाबेथ : द गोल्डन एज’ (2007) साठी केट ब्लँचेटने पहिला ऑस्कर पटकाविला होता. शेखर कपूर यांनी ‘मासूम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, जुगल हंसराज आणि उर्मिला मातोंडकर यांनी यात काम केले होते. या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शेखर कपूर यांच्या या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. शेखर कपूर यांनी 1987 चा चित्रपट ‘मिस्टर इंडिया’चे दिग्दर्शन पेले होते. या चित्रपट सुपरहिट ठरला होता. शेखर कपूर यांनी हीथ लेजर यांच्या अंतिम चित्रपटांपैकी एक ‘द फोर फेदर्स’चे देखील दिग्दर्शन केले हेते. तर त्यांनी अलिकडेच ब्रिटिश कॉमेडी चित्रपट ‘व्हॉट्स लव गॉट टू डू विद इट’चे दिग्दर्शन केले होते.









