शहर-परिसरात जनजीवन विस्कळीत
बेळगाव : बुधवारी पहाटेपासूनच जोरदार पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली होती. पावसाचा जोर इतका होता की बघता बघता सर्वत्र पाणी होत होते. जोरदार पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचीही तारांबळ उडाली आहे. घरात शिरलेले पाणी काढताना साऱ्यांनाच कसरत करावी लागत होती. पाणी काढेल तसे पुन्हा घरामध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. यामुळे अनेकांना घरे सोडून इतरत्र ठिकाणी जावे लागले आहे. एकूणच बुधवारी मुसळधार पावसामुळे साऱ्याचीच दैना उडाली होती.
पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पाऊस सतत पडत असल्यामुळे नदी-नाल्यांचे पाणी पात्राबाहेर वहात आहे. तर त्या परिसरातील शिवारात पाणी साचून त्यामधील पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर सुरूच असल्यामुळे पुढील दोन दिवस जिल्ह्याधिकाऱ्यांनी शाळा व पीयु कॉलेजना सुटी जाहीर केली आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दुपारी सूर्यदर्शन झाले मात्र काही वेळातच पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली.
गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा आणखी जोर वाढला आहे. त्यामुळे पाणथळ शिवारे पाण्याखाली गेली आहेत. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. फेरीवाले, भाजी विक्रेते आणि इतर व्यावसायिकांची पावसाने तारांबळ उडवून दिली. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत होता. त्यामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता.
अनेक घरांची व झाडांची पडझड
पावसामुळे शहरातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून होते. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. वारा आणि पावसामुळे अनेक घरांची व झाडांची पडझड झाली आहे. पाऊस कमी झाला नाही तर मोठा फटका बसण्याची भिती व्यक्त होत आहे. बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदी यासह इतर ठिकाणी असलेल्या लहान नाल्याच्या परिसरातील जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बळ्ळारी नाल्याचे पाणी तर गेल्या आठ दिवसांपासून शिवारातच जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील भात पिक कुजून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे दररोज पाण्यामध्ये वाढ होऊ लागली आहे.
बुधवारी दमदार पावसामुळे साऱ्यांनाच रेनकोट आणि छत्र्यांचा आधार घ्यावा लागला. मात्र जोर अधिक असल्यामुळे रेनकोटमधूनही पाणी आत जाऊन कपडे ओल होत होते. त्यामुळे रेनकोट परिधान करूनही त्याचा उपयोग होत नसल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शहरातील लेंडी नाला देखील तुडुंब भरून वाहत असून त्याचे पाणीही शिवारात शिरले आहे. या नाल्याच्या परिसरातील पीक पाण्याखाली गेले आहे. या पावसाने स्मार्ट सिटीच्या कामांचा विविध कामांचा दर्जा उघड्यावर आला आहे. रस्ते उखडून गेले आहेत. तर पदपथांची अवस्थाही दयनीय झाली आहे.