10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग : नदीकाठच्या 22 खेड्यांना सतर्कतेचा इशारा
संकेश्वर : हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयाचे दहाही दरवाजे बुधवारी खुले करण्यात आले. जलाशयातून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून हिरण्यकेशी व घटप्रभा नदीकाठच्या 22 खेड्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलाशयातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. गत आठवडाभरात सातत्याने पडत असणाऱ्या पावसाने महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातून हिरण्यकेशी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने आठवडाभरात 45 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
पावसाची संततधार कायम असल्याने जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची होणारी आवक लक्षात घेता बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जलाशयाचे दहाही दरवाजे खुले करून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दारे खुली करताच जलाशयातून विसर्ग होणारे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. जलाशयासह हिरण्यकेशी व घटप्रभा नदीकाठी असणाऱ्या लोकवस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुराची परिस्थिती हाताळण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असून नदीच्या पाणी पातळीवर पूर नियंत्रण पथकाची नजर ठेवून असल्याची माहिती तहसीलदार नाईक यांनी दिली आहे.