जलाशयाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात तीन दिवस धुवाधार पाऊस होत असल्याने जलाशय पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. पाणीपातळी 2475 फुटावर स्थिर ठेवण्याची जणू कसरतच करण्याची वेळ शहर पाणीपुरवठा विभागावर आली आहे. जलाशयाच्या वेस्ट वेअरच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे 7 इंचांनी उचलूनही पाणीपातळीत वाढ होत असल्याने तीन क्रमांकाचा दरवाजाही दुपारी उघडण्यात आला. बुधवारी सायंकाळी क्र. 2 आणि 5 हे दोन दरवाजे 9 इंचांनी तर तीन क्रमांकाचा दरवाजा दोन इंचांनी उघडण्यात आल्याने मार्कंडेय नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीला मिळणारे सर्व नाले आता दुथडी भरून वाहू लागले आहेत. राकसकोप जलाशयापुढील राकसकोप रस्त्यातील बिजगर्णी नाल्यावरील पुलाजवळील जुन्या मार्कंडेय नदी पात्राचे पाणी रस्त्याबरोबर वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तुडये-शिनोळी दरम्यानच्या रस्त्यातील शिनोळी गावाशेजारील कमी उंचीच्या पुलाजवळ दीड फूट पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
बुधवारी सकाळी जलाशय परिसरात 84.6 मि.मी. तर एकूण 1444.6 मि.मी. पावसाची नोंद झाली तर पाणीपातळी प्रथमच 2475 फुटापुढे नोंद झाली आहे. सकाळी 2475.50 पाणीपातळी नोंद झाली. मागील वर्षी याचदिवशी ही पाणीपातळी 2472.20 फूट होती. बुधवारी सायंकाळी पाणीपातळीत विसर्गानंतरही वाढ होत 2475.90 फूटापर्यंत गेली. जलाशयाच्या वेस्ट वेअर दरवाजांची पाणी साठवण पातळी ही 2479 फुटांपर्यंत आहे. पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे तुडये गावच्या भात शेतीत पूरमय परिस्थिती निर्माण झाली. तर राकसकोप परिसरातील नदीपात्र परिसरातील भातपिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. जलाशय पाणीपातळी 2475.90 फूट झाल्याने जलाशय काठावरील तुडये, मळवी, बेळवट्टी, राकसकोप, इनाम बडस येथील शेतकऱ्यांच्या पिकातून पाणी शिरल्याने शेती पिकांचे नुकसान होणार आहे.