सुमारे 30 गावांवर रविवारपासून अंधाराचे साम्राज्य : दैनंदिन व्यवहार ठप्प : भूमिगत वीजवाहिन्यांची गरज : अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-कणकुंबी भागातील वीजपुरवठा रविवारपासून गायब झाल्यामुळे या परिसरातील सुमारे 30 गावांमध्ये अंधाराचे साम्राज पसरले असून वीजेअभावी दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. जांबोटी परिसरात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा वीजपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांना अनियमित वीजपुरवठ्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. जांबोटी विभागात येणाऱ्या सुमारे 30 पेक्षा जास्त गावांना मच्छे (बेळगाव) वीज वितरण केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो, मात्र या भागातील वीज वाहिन्यांचा मार्ग संपूर्ण जंगलमय प्रदेशातून गेला असल्यामुळे तसेच या भागात उप वीज वितरण केंद्राची सुविधा नसल्याने मच्छेपासून चोर्ला गावापर्यंत थेट वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असल्याने वीज वाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडणे, वादळी वाऱ्यामुळे वीजखांब मोडणे, वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडणे आदी कारणांमुळे, पावसाळ्dयाच्या सुरुवातीपासूनच या भागातील वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो.
वास्तविक पाहता हेस्कॉमने पूर्व खबरदारी घेऊन उन्हाळ्यातच वीज वाहिन्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून वीजवाहिन्यांचा मार्ग सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. मात्र अपुऱ्या कर्मचारी वर्गाची सबब पुढे करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्यात अनियमित वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे जांबोटी विभागातील सुमारे 30 गावचा वीजपुरवठा रविवारपासून पूर्णपणे गायब झाल्यामुळे संपूर्ण भागावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच विजेअभावी दळप-कांडप तसेच नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे, जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. काही वर्षापासून सरकारने रॉकेल पुरवठा देखील बंद केल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात चाचपडत दिवस कंठावे लागत असल्याने गैरसोय होत आहे.
भूमिगत वीजवाहिन्या घालण्याची गरज
जांबोटी-कणकुंबी विभागात गेल्या अनेक वर्षापासून ऐन पावसाळ्dयात आठ-पंधरा दिवस वीजपुरवठा गायब होतो. यामुळे नागरिकांना आदिवासींप्रमाणे दिवस कंठावे लागत आहेत. या भागातील वीजवाहिन्यांचा मार्ग घनदाट जंगलमय भागातून गेला असल्यामुळे वीजपुरवठ्यात नियमित तांत्रिक बिघाड होऊन नागरिकांना किमान 8-15 दिवस अंधाराचा सामना करावा लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. सुरळीत वीजपुरवठ्याअभावी या भागाचा विकास खुंटला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या हा एकमेव पर्याय असल्यामुळे या भागात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यासाठी हेस्कॉमने शासनाकडे पाठपुरावा करावा, अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे. तरी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जांबोटी भागातील वीजपुरवठा त्वरित पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी होत आहे.









