नदी काठाला पुराचा वेढा, ओल्या दुष्काळाची चिंता
बेळगाव : मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी-नाले आणि तलावांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेयच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी शिवारात पसरले आहे. हजारो एकर नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीची वाढती पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
यंदा जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस बसरला नव्हता. सध्या जुलै महिन्यात जून महिन्यातील बॅकलॉक पावसाने भरून काढला आहे. वाढत्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. 2019 मध्ये मोठा पूर येऊन ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा देखील ती परिस्थिती ओढवणार काय? अशी भीती शेतकऱ्यांना लागली आहे. मार्कंडेय नदीचे पात्र कमी झाल्याने नदी काठावरील शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये ऊस, भात आणि इतर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेषत: मागील आठवडाभरापासून भात पिकांत पाणी साचून असल्याने ते कुजण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दुबार लागवडीचे संकट उभे ठाकले आहे. तर पावसाचा जोर आणखी काही दिवस राहिल्यास काही क्षेत्र पडीक राहण्याची भितीही व्यक्त होत आहे. नाले, ओढे आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. शिवाय राकसकोप पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जलाशयातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत केला जात आहे. त्यामुळे मार्कंडेय नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे पाणी नदीकाठी असलेल्या पिकांमध्ये शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरात पुराची धडकी कायम आहे.
जुलै महिन्यात अधिक पाऊस
यंदा जुलै महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे. शिवाय पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा ओल्या दुष्काळाची चिंता व्यक्त होऊ लागली आहे.









