हौदात प्रवेश कऊन गोंधळ घातल्याने सभापतींकडून कामकाज तहकूब
पणजी : लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी केवळ सत्ताधाऱ्यांनाच संधी देण्यात येते, विरोधकांना डावलण्यात येते. हा भेदभाव आहे, असा आरोप करत विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. तरीही सभापती अन्य आमदारांना सूचना मांडण्याचे आदेश देत राहिल्याने अधिकच आक्रमक बनलेल्या विरोधी आमदारांनी सभापतींच्या समोरील हौदात धाव घेत गोंधळ घातला. विरोधक ऐकत नसल्याने सभापतींनी शेवटी कामकाज तहकूब केले. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत तब्बल चार वेळा कामकाजास स्थगिती देण्याचा प्रकार अनुभवलेल्या विधानसभेने दुसऱ्याही आठवड्यातील पहिल्या दिवशी तोच अनुभव घेतला. शून्य प्रहारानंतर लक्ष्यवेधी सूचनेवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी वीज आणि शिक्षण खात्याच्या मंत्र्यांना निशाण्यावर घेतले व प्रश्नांचा भडीमार करून घेरण्याचे प्रयत्न केले.
लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी केवळ सत्ताधाऱ्यांनाच संधी देण्यात येते, विरोधकांना डावलण्यात येते. हा भेदभाव आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला. यावेळी सर्व विरोधक आक्रमक बनले व त्यांनी गदारोळ करण्यास प्रारंभ केला. तरीही सभापती अन्य सदस्यांना लक्षवेधी सूचना मांडण्याचे आदेश देत राहिले. त्यामुळे अधिकच आक्रमक बनलेल्या विरोधकांनी गोंधळ घालत सभापतींच्या हौदाकडे कूच केली. युरी आलेमाव, विजय सरदेसाई, कार्लोस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, वेन्झी व्हिएगश, क्रूझ सिल्वा व वीरेश बोरकर आदींचा त्यात समावेश होता. पहिले सत्र संपण्यास केवळ 15 मिनिटे शिल्लक होती. विरोधकांचा गोंधळ थांबत नाही ते पाहून सभापतींनी कामकाज तहकूब केले.
प्रश्नोत्तर काळात विविध आमदारांनी मतदारसंघात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे विचारणा केली. त्यावर बोलताना राज्यात वीज कपात 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. याशिवाय भूमिगत वीजवाहिनीबाबत विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली. दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या शून्य प्रहरात एल्टन डिकॉस्ता, संकल्प आमोणकर, जीत आरोलकर, वीरेश बोरकर, डिलायला लोबो, मायकल लोबो आदींनी आपापल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या.









