जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून खानापूर तालुक्यातील पुलांची पाहणी
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी-नाल्यावरील पुलावर पाणी येऊन काही गावांचा संपर्क तुटत आहे. सुरु असलेल्या मुसळधार पावसाची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खानापूर तालुक्यातील अनेक पुलांची, रस्त्यांची पाहणी करुन पुलांची उंची वाढवण्यासंदर्भात संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यात खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलाच्या बाबतीतही या पुलाच्या उंची वाढवण्यासंदर्भात संबंधित खात्यांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सूचना केल्या आहेत. पडत असल्यामुळे पावसामुळे मलप्रभा, हलात्री, पांढरी नदी यासह नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने काही लहान पुलावर पाणी आल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटत आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्याचा पाहणी दौरा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यानी हलात्री नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने या पुलावर मोठा पाऊस झाल्यास पाणी येऊन खानापूरपासून हेम्माडगापर्यंत असलेल्या गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे असल्याचे जि. पं. च्या तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती. मात्र याची दखल घेण्यात आली नव्हती. तसेच होत असलेल्या पावसाबाबत तालुक्यातील खबरदारीच्या उपाययोजनांची सज्जता ठेवण्यात यावी, याबाबत त्यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याशी चर्चा करुन सूचना केल्या आहेत.
पाऊस कमी झाल्यानंतर हेम्माडगा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार
या पाहणी दौऱ्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संतोष होणकांडे यांनी या रस्त्याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच सध्या मणतुर्गा येथे रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्ग निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करण्यात आला आहे. या पर्यायी मार्गावर तसेच फाटकापासून दोन्ही बाजूला एक-एक कि. मी. नव्याने रस्ता करण्यात येणार असून या कामाच्या निविदाही मंजूर झाली आहे. काही दिवसानंतर या रस्त्याचेही काम होणार असून खानापूर ते हेम्माडगा या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या भराव टाकून तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाऊस कमी झाल्यानंतर फाटकाच्या दोन्ही बाजूला आणि पर्यायी मार्गावर खडीकरण करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे हेम्माडगा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









