महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी ‘दोनशे पार’ द्वारे सत्तेचे ध्येय साध्य करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संभ्रम दूर करून जशास तसे उत्तर देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रविवारी झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात दिले. महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब असून उद्धव ठाकरे हे त्याचे अध्यक्ष आहेत, शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके आहेत, पराभूत होऊनही राहुल गांधी फुग्यासारखे फुगले आहेत अशी जोराची टीका शहा यांनी करून विधानसभा निवडणुकीचा नारळ फोडला. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जेव्हा शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळेला डिवचलेला हा वाघ महाराष्ट्रात येऊन डरकाळी फोडणार हे निश्चित झाले होते. अजित पवार यांना सोबत घेतल्याचा मुद्दा संघाला मानवलेला नाही आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रात जाणवणार याची पुरती जाणीव असलेल्या शहा यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि विचारधारा भाजपने कधीही सोडलेली नाही असे स्पष्ट करत ध्येय साध्य करण्यासाठी तह किंवा सलगी करावी लागते अशा शब्दात समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या कथानकाच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे आणि त्यासाठी आधी संभ्रम दूर झाला पाहिजे हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातला प्रचार हिंदुत्ववादावर होईल असे संकेत शहा यांच्याकडून देण्यात आले आहेत. अजित पवार यांना सोबत घेतले असले तरी शरद पवार यांच्या विरोधात आपली भ्रष्टाचाराची लढाई सुरूच आहे आणि पवार यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप दिले असल्याचा आरोप करून अजित पवार यांना सोबत घेऊनच शरद पवार यांच्या विरोधात लढाई करावी लागणार आहे हे शहा यांनी स्पष्ट केले आहे. आता हा मुद्दा संघ आणि भाजप कार्यकर्ते किती मनावर घेतात हे लवकरच समजेल. संसदेचे अधिवेशन तोंडावर असताना आणि मित्रपक्षांनी भाजपची कोंडी केलेली असताना सुद्धा शहा महाराष्ट्रात आले होते. यावरूनच महाराष्ट्राची लढाई त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या तीन राज्यांच्या निवडणुका या भाजपसाठी आणि इंडिया आघाडीसाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चारसो पारचा नारा देणाऱ्या भाजपला आपण अडीचशेच्या आत गाशा गुंडाळायला लावला, एका अर्थाने भाजप पराभूत झाला असे वातावरण करण्यात इंडिया आघाडीला यश आले आहे. भाजप कार्यकर्तासुद्धा या मानसिकतेचा बळी ठरला आहे. यातून त्यांना बाहेर काढून पुन्हा लढायला सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रात या तिन्ही पक्षांना थेट अंगावर घेणे आवश्यक होते. अमित शहा यांनी राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपेक्षा पहिला घाव स्वत:च घालावा असा विचार करून या अधिवेशनात टोकाची टीका केली. अर्थात त्याला उत्तर सुद्धा तितकेच टोकाचे मिळाले आहे. ठाकरे यांच्या वतीने बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिन्हा पुढे झुकलेलेल्यांचे सरदार वगैरे टीका केली तर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत असताना अमित शहांच्या मागे कोण होते? असे विचारून आदर्श घोटाळ्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या भाजपमध्ये असल्याबद्दल अंगुलीनिर्देश केला. शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप दिले या आरोपामागे यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पवारांना राज्य सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळे आणि सहकारी साखर कारखान्यांचे खाजगीकरण केल्याच्या प्रकरणात गुंतवण्याचे प्रकरण आहे. एका तक्रारदाराने याबाबत न्यायालयात केलेल्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल फिर्यादीची दखल घेऊन त्यावेळी शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावण्याची तयारी केली होती. तेव्हा राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज फुटल्याने पवार यांचा पक्ष खिळखिळा झाला होता. अंतिम घाव म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र ईडीने आपल्याला चौकशीला बोलवण्यापूर्वी आपणच चौकशीला हजर राहणार आहोत म्हणून पवार यांनी जाण्याची तारीख जाहीर करून नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही अशी भूमिका घेतली होती. ते प्रकरण भाजपवर शेकले. सातारा येथील ऐतिहासिक पावसात भिजल्यानंतर पवार यांच्यावर मतांचा प्रचंड वर्षाव होऊन अपेक्षेपेक्षा तिप्पट आमदार निवडून आले. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना, अजित पवार यांचा सकाळी आठ वाजताचा शपथविधी, 80 तासानंतरची माघार, उद्धव ठाकरे यांचे राज्यारोहण आणि शिवसेना, राष्ट्रवादी या दोन पक्षातील अभूतपूर्व फूट, आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल इतक्या घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा अमित शहा यांनी शरद पवार यांना लक्ष केले आहे पण, मुद्दा सुद्धा तोच ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे का याबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. विधिमंडळाचे अधिवेशनावेळी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यामागे सत्ताधाऱ्यांचा हाच डाव होता. विरोधक त्यात फसले नाहीत. भुजबळ यांना पुढे करून शरद पवार हेच या बैठकीला विरोधक जाऊ नयेत या भूमिकेमागे होते अशी टीका झाली. दुसऱ्याच दिवशी भुजबळ पवारांच्या भेटीला गेले.पवारांनी डाव भुजबळांवर उलटवला.अडकले ते सत्ताधारी. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला याची जाणीव नाही आणि पन्नास लोकांमध्ये सामोपचाराची बैठक होऊ शकत नाही. त्यामुळे आवश्यक असणारे चार-पाच लोक घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ असे पवार यांनी सांगून सरकारला अडचणीत आणले होते. आता फडणवीस यांनी त्या पुढचा डाव टाकला आहे. तावडे आणि मुंडे यांना व्यासपीठावर प्रमुख जागी विराजमान करून मराठा आणि ओबीसीमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्याचे आणि त्यासाठी साधन म्हणून उपयोगात येणारे हे मुद्दे कितपत यशस्वी होतात हे येणारा काळ सांगेलच. पण, काश्मीर हल्ल्यानंतर अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्या अपेक्षेनुसार शहा महाराष्ट्रात स्वत: उतरले. त्यामुळे विरोधकांचा हेतू साध्य झालाच, शिवाय भ्रष्टाचाराचा आरोप करूनसुद्धा तो अद्याप सिद्ध का करता येत नाही याचे उत्तर अमित शहा यांनी देऊन आतापर्यंतच्या खेळी का फसल्या याची जणू कबुलीच दिली आहे.
Previous Articleसडलेल्या मांसाप्रमाणे गंध असलेले फूल
Next Article मुंबई सिटीशी दास करारबद्ध
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








