रस्ते अत्यंत खराब झाल्याने मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी महानगरपालिकेचे उपायुक्त उदयकुमार तळवार यांना बेळगाव ट्रेडर्स यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. रविवार पेठ, केळकरबाग, नरगुंदकर भावे चौक, फुलबाग गल्ली, देशपांडे पेट्रोल पंप परिसर याचबरोबर भाग्यनगर येथील दुसरा क्रॉस याचबरोबर या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे आणखीणच हे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करणेही अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात केली. यावेळी पद्मप्रसाद हुली, संतोष दरेकर व इतर उपस्थित होते.









