जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : विभाग (होबळ्ळी) स्तरावर एक स्टेडियम निर्माण करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात यावेत, असे जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गोकाक ता. पं. कार्यालयात गुरुवारी विविध विकासकामांचा आढावा घेऊन ते बोलत होते. रोहयोजनेतून शाळांची विकासकामे करण्याकरिता क्रिया योजना तयार करप्वी. सरकारी पीयु महाविद्यालय व शालेय विद्यार्थ्यांसाठी डेस्क उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शाळांमध्ये स्वच्छता, शौचालये, किचन शेड, डायनिंग हॉल, ही कामे टप्प्याटप्प्याने हाती घेऊन अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
कामे पूर्ण करण्याचे आदेश
जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ग्रा. पं. च्या व्याप्तींमध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजना राबवण्यात याव्यात. पात्रताधारक नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यात यावेत, जनावरांना व्हॅक्सिन देण्यात यावी, ग्रामीण भागात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची वेळोवेळी चाचणी करण्यात यावी, शुद्ध पाणीपुरवठा करावा, जलजीवन योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी, असा आदेश अधिकाऱ्यांना दिला.
कित्तूर राणी चन्नम्मा वसती शाळेला राहुल शिंदेंची भेट
तत्पूर्वी जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी खणगाव ग्रा. पं. च्या व्याप्तीत येणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्मा वसती शाळेला भेट दिली. यावेळी मुलांची हजेरी, प्रवेश संख्या, वसती शाळेतील सुविधा, जेवण, शाळा सुरू झाल्यापासून उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याची पाहणी केली. मेलमट्टी ग्राम. पं. ला भेट देऊन मेळवंकी येथील बहुग्राम पाणीपुरवठा योजना, शुद्ध पाण्याचे घटक तसेच तवग ग्रा. पं. ला भेट देऊन अंगणवाडी केंद्रांची पाहणी केली. मुलांची हजेरी, धान्य व इतर सुविधांची पाहणी करून डिजिटल ग्रंथालयालाही भेट दिली. यावेळी ता. पं. कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता उदयकुमार कांबळे, पंचायत राज खात्याचे साहाय्यक संचालक विनयकुमार, बाल विकास योजना अधिकारी टी. एस. कोडवकलगी यांच्यासह पंचायत विकास अधिकारी उपस्थित होते.









