बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये वाहन पार्किंगसाठी प्रशासनाकडून सुसज्ज जागा निर्माण करून देण्यात आली आहे. मात्र, ही जागाही अपुरी पडत असल्यामुळे वाहन धारकांकडून मिळेल त्याठिकाणी वाहने लावली जात आहेत. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. येथील पार्किंगला शिस्त लावण्याची मागणीही जोर धरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा पंचायत कचेरी रोड या रस्त्यावर दुतर्फा वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीला कारण ठरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वाहन पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था करून देण्यात आली असली तरी जागेचा अभाव निर्माण होत आहे.
त्यामुळे चारचाकी वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दुतर्फा चारचाकी वाहने लावण्यात येत असल्याने इतर वाहनांना ये-जा करताना अडचण होत आहे. तसेच जिल्हा पंचायत ते कचेरी रोड, खंजर गल्ली क्रॉसपर्यंतचा रस्ता अरुंद असतानाही दुतर्फा वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.









