आषाढी वारीसाठी गेलेल्या वारकऱ्यांना आमदार विठ्ठल हलगेकरांच्या वतीने फराळाचे वाटप होणार
खानापूर : खानापूर तालुक्यात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून तालुक्याच्या सर्वच गावात वारकरी आहेत. या वारकऱ्यांची आषाढी वारी परंपरा आहे. यासाठी तालुक्यातील हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. काही गावात पायी दिंडीची परंपरा आहे. यासाठी आळंदी पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी यापूर्वीच गेले आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून हजारो वारकरी पंढरपूरला रवाना होत आहेत. गेल्या काही वर्षात तालुक्यात वारकरी सांप्रदाय वाढला असून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वारकरी सांप्रदाय पोहचला आहे. यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये आता ज्ञानेश्वरी पारायण सोहळेही सुरू झाले आहेत. तालुक्यातील बहुसंख्य वारकऱ्यांची आषाढी वारी असल्याने आषाढी एकादशीलाच मोठ्या संख्येने तालुक्यातील वारकरी पंढरपूरला जातात. त्या ठिकाणी जवळपास एक आठवडाभर त्यांचा मुक्काम असतो.
तालुक्यातील काही गावांनी पंढरपूरला जागा घेऊन त्या ठिकाणी आपल्या गावचे निवासस्थान निर्माण केले आहे. त्या निवासस्थानामध्ये संबंधित गावातील वारकरी राहतात. बाकीच्या गावातील वारकऱ्यांच्याही पंढरपूरमध्ये ठरलेल्या जागा आहेत. त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. गावागावामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी ट्रक, टेंपो, क्रूझर तसेच इतर वाहनांतून पंढरपूरला जातात. काही गावातून पायी दिंडीत वारकरी सहभागी होतात. हे वारकरी आळंदीहून सहभागी होतात. एकादशी दिवशी वाहनातून गेलेले वारकरी आणि दिंडीत सहभागी झालेले वारकरी एकत्र भेटून विठुरायाचे दर्शन करून दहीकाला करून चार दिवसाच्या मुक्कामानंतर खानापूरला परततात. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून गेल्या काही वर्षापासून पंढरपुरात खानापूर तालुक्यातील वारकऱ्यांसाठी यावर्षीही फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर आपल्या सहकाऱ्यांसह पंढरपूरला रवाना झाले आहेत. या ठिकाणी खानापूर तालुक्याच्या वारकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच खानापूर तालुक्यातील वारकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.