नेहमी घराबाहेर असणारी माणसे आजारी पडली की, त्यांना अनिवार्यपणे घरातच रहावे लागते, असा अनुभव आपल्यालाही आहे. तथापि, एखाद्या घरामुळेच आजारी पडण्याची वेळ येत असेल तर तशा घरासंबंधी बऱ्याच वदंता निर्माण होतात आणि अशी घरे किंवा वास्तू एक मोठे गूढ बनून प्रसिद्धीस येते.
पश्चिम बंगालमधील बोलपूर या शहरातही असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. येथे एक निर्मनुष्य आणि अत्यंत जुने घर पाडण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी जेसीबी मशिन मागविण्यात आले होते. घर पाडण्यासाठी मजुरांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मजुरांनी हे घर पाडण्यास प्रारंभ करताच काही दिवसांमध्ये ते आजारी पडले. तसेच जेसीबीचे टायही फुटून मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. हे सर्व या गूढ घरामुळेच होत आहे, अशी साऱ्यांची समजूत झाली. त्यामुळे पाडकाम थांबविण्याची वेळ आली.
पुन्हा काही दिवसांच्या नंतर हे घर पाडण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला. यासाठी जेसीबी मशिन्ससह प्रशिक्षित कामगारवर्ग बोलाविण्यात आला होता. यावेळी मात्र, घराच्या भिंती पाडताना कोणताही अडथळा आला नाही. पण या घराच्या पायातून कालीमातेची एक प्राचीन मूर्ती काढण्यात आली, तेव्हा या घराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन पूर्णत: बदलून गेला. इतके दिवस या घराला अपशकुनी समजले जात होते. पण आता ते पवित्र स्थान असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. या घरात सापडलेली कालीमातेची मूर्ती पितळेची आहे. ती 100 वर्षांपूर्वीची असल्याचे काहीजणांचे अनुमान आहे, तर अनेकांच्या मते ती कित्येक शतकांपूर्वीची आहे. शास्त्रीय पद्धतीने तिचे वय शोधून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या या मूर्तीची स्थापना जवळच्या एका मंदिरामध्ये करण्यात आली असून घराच्या स्थानी मंदीर बांधले जाणार आहे.









