उचगावात एल्गार ग्राम रक्षण मेळाव्यात १९ गावांच्या पदाधिकार्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
उचगाव /वार्ताहर
कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला कडाडून विरोध करीत सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीचा दि.१४ रोजी १९ गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उचगावात एल्गार ग्राम रक्षण मेळाव्यात १९ गावांच्या पदाधिकार्यांनी टप्प्याटप्प्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.
उचगाव ता. करवीर येथे १९ गावातील सरपंच ,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचा हद्दवाढविरोधी कृती समितीच्या वतीने एल्गार सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कृती समितीचे अध्यक्ष उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण होते.येत्या रविवारी (दि.१४) प्रत्येक गावात बंद पाळावा, गावागावात हद्दवाढी विरोधी दोन फलक लावण्यात यावेत, असेही ठराव करण्यात आले. दरम्यान, संबंधित नेत्यांनी हद्दवाढीबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पालकमंत्र्यांनी ग्रामीण जनतेला विश्वासात न घेता हद्दवाढीबाबत जे वक्तव्य केले त्याचा निषेध नोंदवत हसन मुश्रीफ यांचा यावेळी जोरदार धिक्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविकात उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी हद्दवाढीला कडाडून विरोध असुन याप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.स्वागत व सुत्रसंचालन किरण आडसूळ यांनी केले.
यावेळी उचगाव सरपंच तथा विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी कोल्हापूर महापालिकेचा कारभाराचा पाढा वाचला. कोल्हापूर मधील अनेक प्रश्न जैसे थे आहेत.त्या प्रश्नाला भिजत घोंगडे ठेवण्याचे काम महापालिका करत आहे. ग्रामीण भागातील जनता ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या सुविधा बद्दल समाधानी आहेत. कोल्हापूर पेक्षा कितीतरी पटीने चांगले रस्ते, गटर्स, विविध सुख सोयी सुविधा,विविध योजना ग्रामपंचायत सक्षमपणे राबवत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील जनता महापालिकेत समाविष्ट होण्यास अजिबात तयार नाही तरी बळजबरीने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ कृती समिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटल्यानंतर मंत्री महोदयांनी सहा गावचा हद्द वाढीमध्ये विचार केला जाईल असे वक्तव्य केल्यानंतर बुधवारी हद्दवाढ विरोधी कृती समितीने हद्दवाढविरोधी सर्व गावांची एकत्रित बैठक उचगाव ग्रामपंचायत या ठिकाणी घेतली.
यावेळी बोलताना गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी आम्ही आमच्या गावचा विकास करण्यास समर्थ आहे. कृती समितीच्या वतीने जी काही आंदोलने करण्यात येतील त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यात येईल तसेच हद्द वाढविरोधी कृती समितीमध्ये कोणतीही राजकारण, पक्षभेद न आणता माझे गाव म्हणून सहभागी होण्याचा निर्णय सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
सरपंचअश्विनी शिरगावे म्हणाल्या,महापालिकेने आपले कचऱ्याचे प्रश्न, पाणी प्रश्न , देवस्थानचे प्रश्न आधी सोडवावे व त्यानंतरच आमच्या गावाकडे वक्रदृष्टी करावी. हद्द वाढीचा आम्ही तीव्र निषेध करतो.
वडणगे सरपंच संगीता पाटील,पाचगाव सरपंच प्रियांका पाटील, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी अडसूळ व सर्व महिला सरपंच यांनी हद्दवाढीला ग्रामस्थांचा कडाडून विरोध असून कोणत्याही परिस्थितीत विश्वासात न घेता निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
करवीर तालुका शिवसेना उबाठा गटाचे राजू यादव यांनी चळवळीमध्ये प्रथमपासूनच शिवसेना अग्रभागी आहे. कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही प्रसंगी आत्मदहन करू,हायवे बंद करू असा इशारा दिला.
यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष नारायण गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोरा बाळासह जनावरे देखील घेऊन मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला.
माजी सरपंच कावजी कदम,छत्रपती विकास संस्थेचे माजी चेअरमन संजय चौगुले यांनी अंतर्गत प्रश्न सोडवण्यास महापालिका पूर्णपणे फेल गेली आहे. अनेक मोठे घोटाळे महापालिकेत होत आहेत. कोल्हापूरचे अनेक माजी नगरसेवक हद्दवाढ नको म्हणत आहेत. पहिल्यांदा कोल्हापूर शहराचा चांगला विकास करा स्वतः हुन गावे कशी येतील याचा विचार करा. हद्दवाढ लादु नका .
यावेळी पाचगाव सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडी सरपंच ए.बी.कांबळे ,कळंबे सरपंच सुमन गुरव, कंदलगाव सरपंच राहुल पाटील, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी अडसूळ, गडमुडशिंगी सरपंच अश्विनी शिरगावे, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, वळीवडे उपसरपंच भैय्या इंगवले, शिये सरपंच शितल मगदूम, वडणगे सरपंच संगीता पाटील,आंबेवाडी सरपंच सुनंदा पाटील, नागदेवाडी सरपंच रवींद्र पोद्दार, बालिंगा माजी सरपंच मयूर जांभळे, पिरवाडी सरपंच शुभांगी मिठारी, अमर मोरे मोरेवाडी, उचगाव उपसरपंच तुषार पाटील, संग्राम पाटील,अनिल पंढरे,कावजी कदम,अनिल शिंदे,राजेंद्र संकपाळ, अरुण शिरावे, सुदर्शन पाटील, रावसाहेब पाटील,बाळासो मनाडे, दिपक रेडेकर, मनसे तालुकाप्रमुख अभिजित पाटील यांच्यासह सर्व गावचे ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांची पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
आभार ए.बी. कांबळे यांनी मानले .
हदवाढ कोणासाठी?
बिल्डर लॉबीसाठी मोजके चार-पाच जण हद्दवाढीचा मुद्दा पुढे करत आहेत. ग्रामीण भागातील जागेवर त्यांचा डोळा आहे. शेतजमीन, पशुपालन, कृषी रोजगार, दुग्ध व्यवसाय या सर्वावर हद्द वाढीमुळे गदा कोसळणार आहे, असाही सूर या परिषदेत व्यक्त झाला.
जोरदार घोषणाबाजी
उचगाव ग्रामपंचायतच्या सभागृहात 19 गावातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. ‘हद्द वाढ रद्द झालीच पाहिजे’अशा जोरदार घोषणांनी सभागृह हादरून गेले.