इनामदार कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : महात्मा फुले मार्केटची संपूर्ण जागा ही आपली आहे. मात्र महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला नाहक त्रास देत आहेत. तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सय्यद खाजापाशा अहमदपाशा इनामदार व इनामदार कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महात्मा फुले मार्केट व कांदा मार्केट सर्व्हे क्र. 922 मध्ये दोन एकर 21 गुंठे जागा आहे. ती जागा आपली असून त्या जागेचा वाद होता. मात्र पहिले अतिरिक्त दिवाणी न्यायालयामध्ये त्या जागेचा निकाल आपल्या बाजूनेच लागला आहे. दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये महानगरपालिकेने दाखल केलेल्या दावादेखील फेटाळला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.तरीदेखील महानगरपालिका ही जागा कब्जात घेऊन त्या जागेमध्ये असलेले गाळे लिलाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असताना महानगरपालिकेचे आयुक्त तसेच महसूल अधिकारी संतोष शेट्टर, अनुराधा तापसी, नंदू बांदिवडेकर यांनी बेकायदेशीर आपल्या जागेमध्ये हस्तक्षेप सुरू केला आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.









